वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
रोहित राजपाल वैयक्तिक कारणांमुळे संघासोबत जाऊ शकले नसल्याने भारताचे प्रशिक्षक झीशान अली हे पाकिस्तानविऊद्धच्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेतील ऐतिहासिक लढतीत भारताच्या डेव्हिस चषक संघाचे ‘नॉनप्लेइंग कॅप्टन’ म्हणून दुहेरी जबाबदारी सांभाळणार आहेत. अखिल भारतीय टेनिस महासंघाचे (एआयटीए) सरचिटणीस अनिल धुपर यांनी याची पुष्टी केली आहे.
कुटुंबातील आरोग्यविषयक समस्यांमुळे राजपाल पाकिस्तानला गेले नसल्याची माहिती मिळाली आहे. ‘आमचा नॉनप्लेईंग कॅप्टन रोहित राजपाल काही वैयक्तिक कारणांमुळे संघासोबत जाऊ शकलेला नाही. पण मला हे सांगण्यास आनंद होत आहे की, आम्ही झीशान अली या अत्यंत वरिष्ठ खेळाडूची संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे,’ असे धुपर यांनी मंगळवारी सांगितले.
झीशान याच्या नेतृत्वाखाली भारत पाकिस्तानमध्ये चांगली कामगिरी करेल असा आम्हाला ठाम विश्वास आहे, असे धुपर यांनी पुढे सांगितले. भारतीय डेव्हिस चषक संघ मागील 60 वर्षांत प्रथमच पाकिस्तानला जात आहे. पाकिस्तान स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या ग्रास कोर्टवर 3 व 4 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या ‘वर्ल्ड ग्रुप-1’मधील या ‘प्लेऑफ’ लढतीसाठी पाच खेळाडू, साहाय्यक कर्मचारी आणि प्रशिक्षकांसह 10 सदस्यीय तुकडी सोमवारी येथे दाखल झाली. भारतीय डेव्हिस चषक संघाने यापूर्वी 1964 मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता. तेव्हा भारताने लाहोरमध्ये 4-0 ने विजय मिळवला होता.
2019 मध्ये भारत डेव्हिस चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाणार होता. परंतु ‘एआयटीए’ने दोन्ही देशांमधील राजनैतिक तणावाचे कारण देत ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी म्हणजे कझाकस्तान येथे हलविण्यात यश मिळविले होते. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये दुसरी फेरी गाठलेला देशाचा अव्वल मानांकित एकेरी खेळाडू सुमित नागल आणि गेल्या महिन्यातच या लढतीमधून माघार घेतलेला शशिकुमार मुकुंद यांच्या अनुपस्थितीत जागतिक क्रमवारीत 463 व्या क्रमांकावर असलेला रामकुमार रामनाथन भारतीय संघाच्या आव्हानाचे नेतृत्व करेल.
युकी भांबरी हा आता पूर्णपणे दुहेरीचा खेळाडू बनलेला असला, तरी गरज पडल्यास तो एकेरीत खेळू शकतो. भारतीय संघात दिग्विजय प्रताप सिंहसह एन. श्रीराम बालाजी, निकी पूनाचा आणि साकेथ मायनेनी यांचा समावेश आहे. दिग्विजयने सप्टेंबरमध्ये लखनौ येथे झालेल्या भारताच्या मागील डेव्हिस चषक लढतीत मोरोक्कोविऊद्ध पदार्पण केले होते. तो संघातील राखीव खेळाडू आहे.
पाकिस्तानचे आव्हान 43 वर्षांहून अधिक वयाच्या ऐसाम-उल-हक कुरेशी आणि अकील खान या दोन खेळाडूंवर अवलंबून असेल. कुरेशी हा दुहेरीत जागतिक क्रमवारीत 127 व्या क्रमांकावर असून अकील खान हा दीड दशकापूर्वी भारतीय शहरांमध्ये अनेक आयटीएफ स्पर्धा खेळलेला आहे. तसेच 1679 व्या क्रमांकावर असलेला 23 वर्षीय मुझम्मिल मुर्तझा हाही संघाचा भाग आहे.









