वृत्तसंस्था / क्वालालंपूर
इस्लामचा प्रचारक आणि आपल्या अन्य धर्माविरोधातील व्यक्तव्यांनी वादग्रस्त ठरलेला झाकीर नाईक याला मलेशियातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याला असाध्य असा श्वसनयंत्रणा विकार जडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याला विषाणूंचा संसर्ग झाला असून हा विकार कदाचित बरा होण्यासारखा नाही, असे अनेक आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक सूत्रांचे म्हणणे आहे. तथापि, त्याला नेमके काय झाले आहे, हे अधिकृतरित्या अद्याप रुग्णालयाकडून किंवा त्याच्या कुटुंबियांकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्याच्या प्रकृतीविषयी बरेच उलटसुलट तर्कवितर्क केले जात आहेत. नाईक याची पूर्वी भारतात इस्लामचा प्रचार करणारी वाहिनी होती. मात्र, 2024 मध्ये भारतात भारतीय जनता पक्षाचे शासन आल्यानंतर त्याने भारतातून पळ काढला होता. तेव्हापासून तो आजवर कधीही भारतात आलेला नाही. 2016 पासून तो मलेशियात वास्तव्य करीत आहे. भारतावर त्याच्याविरोधात अनेक तक्रारी सादर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आहे. जगातील काही देशांनी त्याला आपल्या भूमीत प्रवेश नाकारला आहे. कट्टर इस्लाम प्रचारक अशी त्याची ओळख आहे. त्याच्यावर पूर्वीही मलेशियात उपचार करण्यात आले आहेत. यावेळी मात्र, त्याच्या प्रकृतीविषयी गुप्तता पाळण्यात येत असल्याने त्याच्या आजाराविषयी बरीच चर्चा होत आहे.









