वृत्तसंस्था/ झाग्रेब
आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक मिळविलेल्या भारताच्या आशूने झाग्रेब ओपन रँकिंग मालिकेतील स्पर्धेत 67 किलो वजन गटातील ग्रीको रोमन कुस्तीमध्ये कांस्यपदक पटकावले.
23 वर्षीय आशूने भारतासाठी मिळवून दिलेले हे या स्पर्धेतील दुसरे कांस्यपदक आहे. कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत त्याने लिथुआनियाच्या ऍडोमस ग्रिगालियुनासवर 5-0 अशी मात केली. यू-23 वर्ल्ड चॅम्पियन व फ्रीस्टाईल मल्ल अमन सेहरावतने याआधी भारताला पहिले कांस्यपदक मिळवून दिले होते. त्याने पहिल्या दिवशी 57 किलो गटात हे पदक पटकावले होते. पात्रता फेरीत आशूला इराणच्या रेहा मेहदी अब्बासीकडून 0-9 असा मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. रेपेचेज फेरीत त्याने मुसंडी मारताना हंगेरीच्या ऍडम फोइलेकचा 8-0, आणि नॉर्वेच्या हॅवर्ड जॉर्गेन्सनवर 9-0 अशी मात केली होती. आशूने कांस्यपदकाच्या पहिल्या फेरीत 3 व दुसऱया फेरीत 2 गुण मिळविल्यानंतर पंचांनी त्याला विजयी घोषित केले.
ग्रीको रोमनमधील आणखी एक मल्ल सागरला (63 किलो) रेपेचेज फेरीत ऑस्ट्रियाच्या अकेर श्मिड अल ओबैदीकडून पराभव पत्करावा लागला. उपांत्यपूर्वतील सागरचा प्रतिस्पर्धी इराणच्या अरेफ हुसेन खौन मोहम्मदीने अंतिम फेरी गाठल्याने सागरला रेपेचेज फेरीत खेळण्याची संधी मिळाली होती. भारताच्या अन्य पुरुष व महिला स्पर्धकांना पदक मिळविण्यात अपयश आले.









