म्हापसा घाटेश्वर नगर येथील घटना : धैर्य दाखवूनही युवती अखेर जखमी,पळालेल्या युसूफला रात्री उशिरा अटक
म्हापसा : म्हापसा येथील कॉलेजच्या विद्यार्थिनीला अज्ञातस्थळी नेऊन लैंगिक अत्याचार केलेल्या खोर्ली म्हापसा येथील युसूफ शेख (40 वर्षे) या इसमाला त्या विद्यार्थिनीने आपली शक्कल लढवित त्याच्या तोंडावर प्रे व मिरची पावडर मारून भर रस्त्यात सर्वासमक्ष यथेच्छ चोप दिला. मात्र तरीही युसूफने तिला मारहाण केल्यामुळे ती जखमी झाली म्हणून तिला इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. तीन दिवसांपूर्वी युसूफ शेख याने या कॉलेज युवतीला आपल्याबरोबर बोलावले होते. त्या दरम्यान तिची दुचाकी बंद पडल्याने ती दुऊस्त करावी लागेल अशी माहिती युसूफला दिली. त्याने आपला गॅरेजवाला मित्र असल्याचे सांगून दुचाकी त्या ठिकाणी दुऊस्त करण्यासाठी देऊया असे सांगितले. युवती व युसूफ यांच्यात व्हॉट्सअॅप चॅट सुरू होते. गाडी गॅरेजमध्ये दिल्यानंतर युसूफने तिला आपल्या व्हॅगनर कार जीए-03-आर-0366 मध्ये बसवून पेडणे भागात नेले. तेथे निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि नंतर तिला खोर्ली येथे घरी सोडले.
युसूफला धडा शिकविण्याचा निश्चय
युसुफने आपला विश्वासघात केला. आपला विनयभंग केला हा राग तिच्या मनात होता. या इसमाला आपण अद्दल घडविणारच असा ठाम निश्चय करून त्या युवतीने दोन दिवस काढले. काल शुक्रवारी सकाळी तिने युसूफला फोन करून भेटण्यास बोलावले. दरम्यानचे दोन दिवस तिने त्याचा फोन ब्लॉक करून ठेवला होता.
युवतीने युसूफला दिला यथेच्छ चोप
याबाबत अधिक माहिती देताना पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी म्हणाले की, शुक्रवारी सकाळी युवतीने युसूफ शेखला खोर्ली येथे बोलावून घेतले. दरम्यानच्या काळात तिने आपली गाडी दुऊस्त केलेल्या गॅरेज मालकाला 6 हजार ऊपये देऊन गाडी घेतली होती. युवतीने बोलावल्यामुळे युसूफ शेख घाटेश्वर मंदिराजवळ आला. तिने त्याला व्हॅगनर कार जीए-03-आर-0366 ची डिकी उघडण्यास सांगितली. युसूफने गाडीची डिकी खोलली असता त्या युवतीने आपल्या सोबत आणलेला प्रे व मिरची पावडर युसूफच्या डोळ्यात मारली. तो खाली पडला. तिने त्याला लाथाबुक्यानी बेदम मारहाण केली.
मिरची पावडर गेली युवतीच्या डोळ्यांत
मात्र दुर्दैवाने प्रे व मिरची पावडर मारताना प्रेचा फवारा व मिरची पावडर त्या युवतीच्या डोळ्यात पडल्याने ती बेशुद्ध पडली. युसूफने तिला मारहाण केली. तोपर्यंत घटनास्थळी येणाऱ्या जाणाऱ्या पादचाऱ्यांनी गर्दी केली. त्यात कॉलेज विद्यार्थीही जमा झाले. घटनेची माहिती मिळाल्यावर म्हापसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी युवतीला जिल्हा आझिलो इस्पितळात दाखल करण्यात आले.
तिच्या गरिबीचा संशयिताने घेतला फायदा
ही युवती गरीब घराण्यातील असून शिक्षणात हुशार आहे. आईवडिलांचे एकमेकांशी पटत नाही. पालक आपल्याशी कधीच गोड बोलत नाही, या मनस्थितीत ती होती. म्हणून युसूफने आपला फायदा घेतला, असे ती म्हणाली. दरम्यान मारहाण झाल्यानंतर युसूफने आपली व्हॅगनर कार व दोन्ही मोबाईल घटनास्थळी ठेवून पळ काढला होता. त्याला रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्याची कार व मोबाईल जप्त केले आहेत. म्हापसा पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक सीताकांत नायक याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.









