वृत्तसंस्था/ लंडन
भारताची दुहेरीची जोडी युकी भांब्री व साकेत मायनेनी यांनी झुंजार खेळ केला तरी त्यांना विम्बल्डनमधील पुरुष दुहेरीच्या लढतीत पहिल्याच फेरीत पराभव स्वीकारावा लागला. मिश्र दुहेरीत सहावे मानांकन मिळालेल्या रोहन बोपण्णा व कॅनडाची गॅब्रिएला डाब्रोवस्की यांचे आव्हानही पहिल्याच फेरीत संपुष्टात आले.
भांब्री-मायनेनी यांना स्पेनचा अलेजांड्रो डेव्हिडोविच फोकिना व फ्रान्सचा अॅड्रियन मॅनारिनो यांच्याकडून तीन सेट्सच्या संघर्षपूर्ण लढतीत 6-4, 4-6, 6-4 असा पराभव स्वीकारावा लागला. दोन तास ही लढत रंगली होती. मिश्र दुहेरीत सहाव्या मानांकित बोपण्णा-डाब्रोवस्की यांनाही पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. 2019 चे चॅम्पियन इव्हान डोडिग व लतिशा चॅन यांच्याकडून त्यांना 7-6 (7-5), 3-6, 4-6 असा पराभव स्वीकारावा लागला. बोपण्णा-डाब्रोवस्की यांनी 2017 मध्ये फ्रेंच ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. त्यांनी पहिला सेट टायब्रेकमध्ये जिंकून चांगली सुरुवात केली होती. पण नंतरच्या दोन सेट्समध्ये त्यांचा जोम मंदावल्याने प्रतिस्पर्धी जोडीने विजय मिळवित आगेकूच केली. 43 वर्षीय बोपण्णाचा हा शेवटचा मोसम असून त्याच्या पराभवामुळे मिश्र दुहेरीतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. पुरुष दुहेरीत त्याने दुसरी फेरी गाठली आहे.

मुलांच्या एकेरीत मानस धामणे विजयी
कनिष्ठ विभागात भारताच्या 15 वर्षीय मानस धामणेने मुलांच्या एकेरीची दुसरी फेरी गाठताना 47 व्या मानांकित ऑस्ट्रेलियाच्या हेडन जोन्सचा 6-2, 6-4 असा सव्वातासाच्या खेळात पराभव केला. त्याची पुढील लढत बोलिव्हियाच्या अग्रमानांकित जुआन कार्लोस प्रॅडो अँजेलोशी होणार आहे. धामणेची ही या मोसमातील दुसरी ज्युनियर ग्रँडस्लॅम स्पर्धा आहे. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये त्याने दुसऱ्या फेरीतून माघार घेतली होती.









