वृत्तसंस्था / दुबई
येथे सुरू असलेल्या एटीपी टूरवरील दुबई ड्युटी फ्री आंतरराष्ट्रीय पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत भारताचा युकी भांब्री आणि त्याचा ऑस्ट्रेलियन साथीदार अॅलेक्सी पॉपरीन यांनी दुहेरीची अंतिम फेरी गाठली. त्याच प्रमाणे पुरुष एकेरीत ग्रिकच्या सित्सिपसने अंतिम फेरीत प्रवेश मिळविताना हॉलंडच्या ग्रिकस्पूरचा पराभव केला.
पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भांब्री आणि पॉपरीन यांनी ब्रिटनच्या जेमी मरे आणि जॉन पियर्स यांचा 6-2, 4-6, 10-7 असा पराभव केला. या लढतीमध्ये भांब्री आणि पॉपरीन यांनी पहिला सेट जिंकल्यानंतर ब्रिटनच्या जोडीने दुसरा सेट जिंकून बरोबरी साधली. पण भांब्री आणि पॉपरीन यांनी तिसरा सुपर टायब्रेकरमधील सेट जिंकून ब्रिटनच्या जोडीचे आव्हान संपुष्टात आणले.
पुरुष एकेरीच्या उपांत्यफेरीच्या सामन्यात ग्रिकच्या सित्सिपसने हॉलंडच्या टेलॉन ग्रिकस्पूरचा 6-4, 6-4 अशा सरळ सेटमध्ये फडशा पाडत अंतिम फेरी गाठली. या कामगिरीमुळे सित्सिपसने तब्बल 5 वर्षानंतर पहिल्यांदाच एटीपीच्या मानांकनातील पहिल्या 10 खेळाडूंमध्ये स्थान मिळविले आहे.









