वृत्तसंस्था/ हिसार
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी युट्यूबर ज्योति मल्होत्राची एनआयए, जम्मू-काश्मीर पोलीस आणि गुप्तचर संस्थेने चौकशी केली आहे. ज्योतिला दहशतवाद्यांशी असलेल्या संबंधांवरुन प्रश्न विचारण्यात आले. या चौकशीदरम्यान तिचा स्मार्टफोन आणि लॅपटॉपची डिजिटल फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली. तिच्या क्लाउड स्टोरेजमध्ये बीएसएफ मूव्हमेंट, रडार लोकेशन आणि हाय सिक्युरिटी झोन दर्शविणारे अनेक व्हिडिओ मिळाले आहेत.
तर कॉल डिटेल रिकॉर्ड्सद्वारे ज्योति एक आंतरराष्ट्रीय क्रमांक आणि दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायोगाशी सातत्याने संपर्कात होती असे कळले. याचबरोबर भारतातून हकालपट्टी करण्यात आलेला पाकिस्तानी दूतावासाचा कर्मचारी दानिशशी संबंधित एका फेक प्रोफाइल्ससोबत चॅट आणि ग्रूपमध्ये ती जोडली गेलेली होती. ज्योतिच्या जीमेल अकौंटमध्ये पाकिस्तानी आयपीद्वारे अनेकदा लॉग इन देखील झाले आहे.
गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर
संशयास्पद प्रवास, विदेशी संपर्क आणि युट्यूब चॅनेलवर अपलोड झालेल्या संवेदनशील व्हिडिओमुळे ती गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर होती. डिजिटल फॉरेन्सिक तपासणीत तिच्या विदेश प्रवासासोबत पठाणकोट, नाथू ला खिंड आणि अरुणाचलच्या सीमावर्ती क्षेत्रांमध्ये संशयास्पद हालचालींचे पुरावे मिळाले आहेत. ज्योतिचा स्मार्टफोन आणि लॅपटॉपची लोकेशन हिस्ट्री, फोटो मेटाडेटा आणि क्लाउड स्टोरेजने रणनीकि आणि सामरिक क्षेत्रांमधील व्हिडिओ रेकॉर्डिंग समोर आणले आहे.
संवेदनशील क्षेत्रानजीक चित्रिकरण
ज्योतिने पाकिस्तान, चीन आणि बांगलादेशला लागू असलेल्या संवेदनशील सीमावर्ती भागांचे व्हिडिओ देखील अपलोड केले होते. तिने राजस्थानच्या थार वाळवंटात सीमेनजीनक एका गावात व्हिडिओ तयार केला होता.









