रेल्वे पकडण्यासाठी रेल्वेरूळावरूनही प्रवास : मिळेल तेथे जागा पकडण्यासाठी धडपड
बेळगाव : राज्योत्सवासाठी बेळगावमध्ये आलेल्या युवकांनी शहरात मोठ्या प्रमाणात धुडगूस घातला. केवळ इतकेच नाही तर रात्री आपापल्या गावी परतण्यासाठी रेल्वेस्थानकावर मोठी गर्दी केली होती. रेल्वे येताच जागा मिळेल तिकडून धावत जाऊन रेल्वेमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसला. हा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल झाला असून, याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी बेळगावमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात राज्योत्सव दिन साजरा केला जात आहे. यासाठी वारेमाप सरकारी खर्च केला जात आहे. बेळगाववर आपला हक्क दाखविण्यासाठी सुरू असलेल्या या खटाटोपामुळे प्रशासनाची नाचक्की होत असल्याचे समोर येत आहे. चाकू हल्ले, पाकीटमारी, मद्याचे सेवन असे अनेक प्रकार शनिवारी दिसून आले.
तिकीट न काढताच स्थानकात प्रवेश
कार्यक्रम झाल्यानंतर शनिवारी रात्री परतण्यासाठी रेल्वेस्थानकावर गर्दी झाली होती. अनेकांनी तिकीट न काढताच स्थानकात प्रवेश केला. एरवी तिकीट नसल्यावर सर्वसामान्यांवर कारवाई करणारे टीसीही मूग गिळून गप्प राहिले. रेल्वे स्थानकात येत असल्याचे दिसताच केवळ प्लॅटफॉर्मच नाही तर रेल्वेरुळावरूनही धावत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यावेळी एखादा मोठा अपघात झाला असता तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न आता विचारला जात आहे.









