देसूर-यळेबैल गावांत युवा वर्गाला शिवचैतन्याचा ध्यास
वार्ताहर /किणये
तालुक्यात शनिवारी दुर्गामाता दौडच्या सहाव्या दिवशी जल्लोषात दुर्गामाता दौड काढण्यात आली. भर पावसातही तरुणांचा उत्साह कायम दिसून आला. पावसात भिजतच धारकऱ्यांनी शनिवारची दुर्गामाता दौड सुरू ठेवली होती. या दौडच्या माध्यमातून गावागावातील तरुण वर्ग एकवटले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. दुर्गामाता दौडनिमित्त गावातील सर्व मंदिरांमध्ये ही दौड जाऊन मंदिरात पूजा करण्यात येऊ लागली आहे. गावागावांमध्ये पहाटे निघणारी दौड तरुणांसाठी नवचैतन्य निर्माण करणारी आहे.शुक्रवारी सायंकाळपासून तालुक्यात पावसाचा जोर वाढलेला आहे. शनिवारी पहाटेपासूनच पावसाच्या सरी बरसत होत्या. बहुतांशी गावांमध्ये पहाटे साडेपाचच्या दरम्यान दुर्गामाता दौडला प्रारंभ करण्यात आला. यावेळी पाऊस सुरूच होता. मात्र या पावसाची तमा न बाळगता पावसात भिजतच तरुण कार्यकर्ते व तरुणी या दुर्गामाता दौडमधून जाताना दिसत होते.
देसूर गावात दुर्गामाता दौडमध्ये तरुणांचा लक्षणीय सहभाग
शनिवारी देसूर गावात काढण्यात आलेल्या दुर्गामाता दौडमध्ये तरुणांचा लक्षणीय असा सहभाग दिसून आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रेरणामंत्र म्हणून दुर्गामाता दौडला सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज की जय.. जय भवानी जय शिवाजी.. असा जयघोष करत संपूर्ण गावभर ही दौड फिरली.
यळेबैल गावात दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद
बेळगुंदी विभागाच्या वतीने शनिवारी यळेबैल गावात काढण्यात आलेल्या दुर्गामाता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तरुण व तरुणींनी पांढरे कुर्ते परिधान केले होते. तसेच डोक्यावर गांधी टोपी व फेटे परिधान करण्यात आले होते. गावात ठिकठिकाणी भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या. यामुळे गावातील वातावरण भगवेमय बनले होते. पावसाच्या सरी सुरूच होत्या. तरीही दौडमध्ये सहभागी असलेल्या तरुण व तरुणींचा उत्साह कायम होता.









