वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीच्या नव्या संसद भवनाबाहेर शरीरावर पेट्रोल ओतून घेत स्वत:ला पेटवून घेणाऱ्या जितेंद्रचा गुरुवारी रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर छपरौली येथे पोलीस सतर्क झाले आहेत. छपरौली येथील पट्टी धंधान येथे राहणाऱ्या जितेंद्रने अनेक वर्षांपूर्वी झालेल्या घटनांप्रकरणी पोलिसांनी कारवाई न केल्याचा आरोप करत अनुसूचित जाती-जमाती आयोगातही तक्रार केली होती. यानंतरही सुनावणी न झाल्याने मंगळवारी जितेंद्रने दिल्लीत नव्या संसद भवनासमोर स्वत:ला पेटवून घेतले होते.
आग लावून घेतल्याने जितेंद्रचे बहुतांश शरीर होरपळले होते. गुरुवारी रात्री उशिरा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. यानंतर त्याच्या कुटुंबीयांसह पट्टी धंधान येथील अनेक लोकांनी दिल्लीत धाव घेतली. तर छपरौली येथे तणावाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता पाहता मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.









