संशयित पोलिसांच्या ताब्यात : पैशाच्या मागणीवरून घटना घडल्याचा अंदाज
वार्ताहर/ कुडची
तरुणाचा चाकूने वार करून खून करण्यात आल्याची घटना कुडची (ता. रायबाग) येथे शुक्रवारी रात्री उघडकीस आली. यासीन राजेसाब जातकर (वय 22), रा. कुडची असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. रोहित जाधव असे संशयित आरोपीचे नाव असून तो स्वत:हून पोलिसात हजर झाला आहे.
कुडची येथील सागरनगरमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा एका तरुणाचा खून झाल्याचे उघडकीस आले. हा मृतदेह यासीन याचा असल्याची ओळख पटली. सागरनगरमध्ये अंगणवाडीच्या कंपाऊंडमध्ये हा खून झाला आहे. त्याच्या अंगावर अकरा वार असून तो जागीच मृत झाला होता. रोहितकडून यासीन पैसे मागत होता, असे समजते. यातून रोहितने रागाच्या भरात हा खून केल्याचे तपासात पोलिसांना आढळले आहे. यासीनवर अकरा वार झाले असल्याने एकट्याने की आणखी काहीजणांनी मिळून हा खून केला आहे, याचा तपास सुरू आहे.
यासिनच्या आईने आणखी दोन संशयितांची नावे पोलिसांना दिली आहेत. त्यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत. यासिनच्या मागे आई, वडील, गर्भवती पत्नी, भाऊ असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, अथणीचे उपअधीक्षक प्रशांत मुन्नोळी तपास करत आहेत. कुडची सरकारी दवाखान्यात विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.









