कोल्हापूर / इंद्रजित गडकरी :
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात खासगी क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध असतानाही कोल्हापूर जिह्यातील तरुणांचा कल मात्र अजूनही सरकारी नोकऱ्यांकडे वाढताना दिसत आहे. समाजात मिळणारा मान, प्रतिष्ठा आणि स्थिरता यामुळे सरकारी नोक्रया तरुणांसाठी आकर्षणाचे केंद्र बनल्या आहेत.
अलीकडच्या काळात केंद्र व राज्य सरकारतर्फे विविध पदांसाठी घेतल्या जाण्राया स्पर्धा परीक्षांकडे कोल्हापूर जिह्यातील तरुण–तरुणी मोठ्या प्रमाणात वळले आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीससी), कर्मचारी निवड आयोग, बँकिंग, रेल्वे, लष्कर, पोलीस भरती अशा विविध स्पर्धा परीक्षा देण्यासाठी जिह्यातील युवकांची लगबग वाढली आहे. विशेषत: ग्रामीण भागातील तरुण–तरुणी मोठ्या प्रमाणात या परीक्षांकडे वळत आहेत.
- आकर्षणाची मुख्य कारणे
सरकारी नोकरीमध्ये मिळणारी सामाजिक प्रतिष्ठा, नियमित पगार, निवृत्ती नंतर मिळणारी पेन्शन, आरोग्य सुविधा, सवलती आणि सुरक्षित भवितव्य ही प्रमुख कारणे असून अनेक पालकही आपल्या मुलांना खासगी कंपन्यांपेक्षा सरकारी सेवेमध्ये दाखल व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करतात. कोल्हापूर जिह्यातील अनेक पालक आपल्या मुला–मुलींसाठी लहान वयातच स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू करतात.
- काही परिसर बनत आहेत स्टडी स्पॉट
कोल्हापूर शहरातील सायबर चौक, शिवाजी विद्यापीठ परिसरात वाचनालय, कसबा बावडा, शिवाजी पेठ, राजारामपुरी या ठिकाणी वाचनालये असल्यामुळे या भागात विद्यार्थी मोठ्या प्रमाणात अभ्यासाला येत असतात त्यामुळे शहरातील ही ठिकाणे विद्यार्थ्यांसाठी स्टडी स्पॉट बनत आहेत.
- कोचिंग क्लासेसचा विस्तार
या वाढत्या मागणीचा परिणाम म्हणून कोल्हापूर शहरासह करवीर, गडहिंग्लज, आजरा, भुदरगड, शिरोळ अशा तालुक्यांमध्येही विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे व कोचिंग क्लासेस मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहेत. कोरोना नंतर विद्यार्थ्यांचा ऑनलाईन कोचिग कडे कल वाढला तर काही कोचिंग संस्था ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने प्रशिक्षण देतात. दरवर्षी हजारो विद्यार्थी या संस्थांमध्ये प्रवेश घेत आहेत.
- यशस्वी विद्यार्थ्यांचे आदर्श
कोल्हापूर जिह्यातील यमगे गावाचा तरूण बिरदेव ड्रोणे अलीकडेच यूपीएसी उत्तीर्ण झाला आहे. सध्या तो जिल्हयातील स्पर्धा परिक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आयडॉल बनला आहे. इतरही काही तरुणांनी यूपीएसी, एमपीससी सारख्या कठीण परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळवले आहे. त्यांच्या यशाच्या कथा सोशल मीडियावर झळकतात व त्या इतर तरुणांसाठी प्रेरणादायी ठरतात. ठआपल्यासारख्या सामान्य कुटुंबातील मुलांनाही जर एवढ्या मोठ्या परीक्षा देता येत असतील तर आपल्यालाही जमेल, असा विश्वास निर्माण होत आहे.
- शेतकरी व कामगार कुटुंबातील मुलांचा वाढता सहभाग
हे विशेष लक्षात येते की केवळ मध्यमवर्गीय कुटुंबातील नव्हे, तर शेतकरी व मजुरांच्या कुटुंबातील मुलेही सरकारी नोक्रयांच्या मागे लागली आहेत. शिक्षणाची संधी मिळाल्यावर ती पूर्ण ताकदीने वापरून ते स्पर्धा परीक्षा देतात. यासाठी काही तरुण काम करून शिकतात, तर काहीजण शैक्षणिक कर्ज घेऊन तयारी करतात.
- शासनाने घ्यावी अधिक जबाबदारी
सरकारकडून वेळेवर परीक्षा घेणे, सरळ सेवा परीक्षांची फी कमी ठेवणे , निकाल जाहीर करणे, भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखणे या गोष्टी अपेक्षित आहेत. अनेक वेळा परीक्षा रद्द होणे, घोटाळे समोर येणे किंवा निकाल लांबणीवर टाकणे यामुळे तरुणांचा संयम सुटतो. त्यामुळे अधिक सुसूत्र व विश्वासार्ह व्यवस्था तयार करणे आवश्यक आहे. कोल्हापूर जिह्यातील तरुण पिढी आपल्या भविष्याकडे अधिक जागरूक झाली आहे. त्यांना स्वत?च्या पायावर उभे राहायचे आहे. सरकारी नोकरी ही त्यांच्या दृष्टीने केवळ एक नोकरी नसून प्रतिष्ठा व सामाजिक ओळखीचे साधन बनली आहे. ही सकारात्मक घडामोड लक्षात घेता शासन, पालक व समाजानेही तरुणांना योग्य दिशा व पाठिंबा देणे आवश्यक आहे.
- स्ट्रटेजी ,सातत्य आणि आत्मविश्वास ही तीन शस्त्रे
आजच्या तरुणांमध्ये जिद्द आणि दिशा आहे. सरकारी नोकरी ही त्यांच्या दृष्टीने केवळ सुरक्षित भवितव्य नसून समाजात काहीतरी करून दाखवण्याची संधी आहे. विशेषत? ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये ही ओढ प्रकर्षाने जाणवते. मात्र फक्त अभ्यास पुरेसा नाही योग्य स्ट्रॅटेजी, सातत्य आणि आत्मविश्वास ही तीन महत्त्वाची शस्त्र आहेत.
जॉर्ज क्रुझ, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, कोल्हापूर
- संयम,सातत्य महत्वाचा
सरकारी नोक्रयांचे तरुणांमध्ये आकर्षण वाढताना दिसत आहे ही जरी सकारात्मक बाब असली तरी विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात पाऊल टाकत असताना कष्ट करण्याची तयारी जिद्द ठेवूनच याचा अभ्यास करावा या परीक्षांची तयारी करत असताना संयम, सातत्य, खूप महत्वाचा आहे.
विवेक कुलकर्णी, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी








