मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे आवाहन : सांखळीत पंतप्रधान राष्ट्रीय अप्रेंटिसशिप मेळावा
सांखळी : राज्यात सुरू झालेल्या मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे सुमारे 2 लाख नोकऱ्यांची निर्मिती होणार आहे. यातून युवकांना भविष्य उज्वल बनविण्याची संधी प्राप्त होणार. तेथील नोकरीसाठी गोमंतकीयांची तयारी असणे आवश्यक आहे. त्यासाठी युवकांनी आपल्यातील कौशल्य विकास शिक्षणावर भर देताना विविध कंपन्यांकडून देण्यात येणाऱ्या अप्रेंटिसशिप संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांखळी रवींद्र भवनात केले. राज्य कौशल्य विकास व उद्योजकता आणि डिचोली व सत्तरी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) यांच्या संयुक्त विद्यमाने साखळी रवींद्र भवनात आयोजित केलेल्या पंतप्रधान राष्ट्रीय अप्रेंटिसशिप मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सांखळीचे उपनगराध्यक्ष आनंद काणेकर, नगरसेवक ब्रह्मांनंद देसाई, रवींद्र भवनचे उपाध्यक्ष विठोबा घाडी, जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, उपसंचालक एस. एस.गावकर, डिचोली आयटीआयचे प्राचार्य जॉन काल्देरो, सत्तरी आयटीआयचे प्राचार्य निलेश गावस उपस्थित होते. आपल्यातील आवडी निवडी नुसार काम करण्याची इच्छा सर्वानाच असते. मात्र प्रत्येकजन स्वत:तील गुण ओळखून त्यानूसार चालतो. अशी व्यक्ती बेरोजगार राहूच शकत नाही. राज्यात विविध क्षेत्रात रोजगाराला मोठा वाव आहे. तेव्हा उपलब्ध संधीचा फ्ढायदा युवकांनी घेणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले. राष्ट्रीय अप्रेंटिसशिप मेळाव्याला वेगवेगळ्या 54 कंपनी व चार सरकारी कार्यालयांनी प्रतिसाद दिला. मेळाव्यात मोठ्या संख्येने युवकांनी भाग घेतला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करून राष्ट्रीय अप्रेंटिसशिप मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले. अल्सिना रिबेलो यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.









