फोंड्यात क्रांतीदिन सोहळा उत्साहात
फोंडा : गोवामुक्तीसाठी पोर्तुगीजाविरोधात क्रांतीकारक लढ्याला प्रारंभ केलेल्या डॉ. राम मनोहर लोहिया यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. तीच क्रांतीज्योत आपल्या स्वातंत्र्यसैनिकाने पुढे नेल्यामुळेच आज गोवा प्रगतीवर मार्गक्रमण करीत आहे. स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान व्यर्थ न जाता ती आघाडी कायम ठेवण्याचे दायित्व आजच्या युवा पिढीवर आहे. पंतप्रधान नरेंद्र मादीजीमुळे देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावलेली आहे तीच प्रेरणा घेत प्रत्येक गोमंतकीयांना गोवा राज्याची प्रतिमा उंचावण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन कृषी मंत्री रवी नाईक यांनी फोंडा येथील क्रांतीदिन सोहळ्यात केले. फोंडा येथील क्रांती मैदानावरील हुतात्मा स्मारकावर मंत्री रवी नाईक व इतर मान्यवरांच्याहस्ते पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी एनआरआय आयुक्त अॅड नरेंद्र सावईकर, फोंडा पालीकेचे नगराध्यक्ष रितेश नाईक, उपनराध्यक्ष दिपा कोलवेकर, नगरसेवक आनंद नाईक, रूपक देसाई, 6 टीटीआर लष्कर दलाचे कर्नल जसवींदर सिंग, अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश कुंडईकर, उपजिल्हाधिकारी रघुराज फळदेसाई, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक रोहिदास नाईक, गोविंद चिमुलकर व अन्य सरकारी अधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. आजच्या युवकांनी अडी अडचणीच्या संकटकाळी खचून न जाता त्या परिस्थितीला धैर्याने तोंड द्यावे. वैचारीक दृष्टीकोन सकारात्मक ठेवून मार्गक्रमण केल्यास यश हे हमखास तुमचेच असेल असे रवी नाईक पुढे बोलताना म्हणाले. हुतात्म्यांना आदरांजली दिल्यानंतर फोंडा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक नितेश काणकोणकर यांच्या पथकाकडून मंत्री रवी नाईक यांनी मानवंदना स्वीकारली. त्यानंतर आल्मेदा हायस्कूल, सरकारी माध्यमिक विद्यालय जुनाबाजार, लोकविश्वास प्रतिष्ठान ढवळी देशभक्तीपर गीताचे सादरीकरण झाले. हेडगेवार हायस्कूलच्या विद्यार्थ्यातर्फे वंदे मातरम् गीताने सोहळ्याची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गिरीष वेळगेकर यांनी केले.









