पार्ट्यांना येणार रंग : मात्र भान राखणे आवश्यक
प्रतिनिधी /बेळगाव
शहर परिसरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. विशेषत: ओल्ड मॅनचे दहन करून नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले जाणार आहे. त्यामुळे
कॅम्प परिसरासह विविध ठिकाणी ओल्ड मॅन उभे करण्यात आले आहेत. मागील दोन वर्षांत कोरोनामुळे थर्टी फर्स्ट निर्बंधाखाली साजरा झाला होता. मात्र यंदा निर्बंधमुक्त थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी तरुणाई उत्साही दिसत आहे.
थर्टी फर्स्टनिमित्त तरुणाईंकडून ओल्या पार्ट्यांचे नियोजन केले जाते. मात्र अशावेळी सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचेदेखील नुकसान होत असते. काही मद्यधुंद युवकांकडून असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोलिसांची नजर असणार आहे. अलीकडे थर्टी फर्स्टला युवकांच्या पार्ट्या वाढल्या आहेत. विशेषत: शहराजवळील शेतीमध्ये नियोजन केले जात आहे. दरम्यान, काही युवकांकडून पिकातच धुडगूस घालण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचेदेखील नुकसान होत आहे. त्यामुळे तरुणांनी भान राखणे आवश्यक आहे.
गतवर्षी 31 डिसेंबर रोजी नाईट कर्फ्यू लागू केला होता. त्यामुळे पार्ट्यांसाठी बाहेर पडणे अडचणींचे बनले होते. मात्र यंदा 31 डिसेंबर उत्साहात करण्यासाठी तरुणाईची लगबग दिसून येत आहे. याबरोबरच हॉटेल, धाबे व इतर ठिकाणी पार्ट्यांसाठी गर्दी होणार आहे. तर काही हॉटेल बुक झाली आहेत.
बालचमू गवत, प्लास्टिक आणि इतर साहित्यांनी आपल्या कल्पनेतून ओल्ड मॅन तयार करू लागले आहेत. विशेषत: कॅम्प परिसरात भव्य ओल्ड मॅन साकारण्यात आला आहे.









