रत्नागिरी :
मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा दर्ग्याजवळ पाण्याच्या टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला. ही घटना शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास घडली. शिशिर शांताराम रावणंग (३६, निवळी-रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. शिशिरचा मृत्यू झाल्याची खबर निवळी रावणंगवाडीसह रत्नागिरीकरांना चटका लावून गेली. तसेच महामार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातांबाबतही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान टँकर चालकावर रत्नागिरी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिशिर हा एअरटेल कंपनीत एरिया मॅनेजर म्हणून काम करत होता. १३ डिसेंबर रोजी तो कामानिमित्त लांजा येथे गेला होता. काम पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी तो लांजा येथून आपली दुचाकी (एमएच ०८ बीए ३६७७) घेऊन रत्नागिरीच्या दिशेने निघाला होता. रात्री ८.१५ च्या सुमारास शिशिर हा हातखंबा दर्ग्याजवळ आला. यावेळी मागून येणाऱ्या टँकरने (एमएच ०५ एफजे ३०५७) शिशिर याला मागून जोराची धडक दिली. या धडकेत शिशिर दुचाकीवरून फेकला गेला. तसेच त्याला गंभीर स्वरुपाची दुखापत झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाला.








