गुजरातमधील वडोदरा येथून घेतले ताब्यात : 4 लाखांचे दागिने जप्त
बेळगाव : भाग्यनगर व मृत्युंजयनगर परिसरात दोन महिन्यांपूर्वी घरफोड्या केल्याच्या आरोपावरून टिळकवाडी पोलिसांनी उत्तरप्रदेशमधील एका युवकाला अटक केली आहे. त्याच्याजवळून चार लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अनिलकुमार मिस्त्राrलाल राजभर (वय 36) रा. बोदारी, उत्तरप्रदेश असे त्याचे नाव आहे. दोन महिन्यांपूर्वी या युवकाने बेळगावात घरफोड्या केल्या होत्या. त्यानंतर गुजरातमधील वडोदरा पोलिसांनी त्याला अटक केली. चौकशीत त्याने बेळगावातही घरफोड्या केल्याची कबुली दिली. यासंबंधीची माहिती मिळताच टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक दयानंद शेगुणशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुजरात गाठले. न्यायालयाची परवानगी घेऊन अनिलकुमारला पोलीस कोठडीत घेण्यात आले. बेळगावात आणून त्याची कसून चौकशी करण्यात आली. विधानसभा निवडणुकी दरम्यान या चोऱ्या झाल्या होत्या. आरोपींनीही त्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याजवळून सुमारे चार लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले आहेत. गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी ही माहिती दिली असून दोन्ही प्रकरणांचा तपास पूर्ण करून त्याला गुजरातला नेण्यात आले.









