पाच वाहनांचा अपघात : एक ठार, सहा जखमी : वाहनांचे मोठे नुकसान
वार्ताहर /तवंदी
निपाणीनजीक तवंदी घाटात बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास पाच वाहनांमध्ये झालेल्या विचित्र अपघातात एक ठार तर सहाजण जखमी झाले. सदर दुर्घटनेत वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. ज्ञानेश्वर सिद्राय गोवेकर (वय 33 रा. कणबर्गी, ता. बेळगाव) असे मृताचे नाव आहे. सचिन लोहार (वय 36), रेवन देसाई (वय 27 दोघेही रा. विटा, जिल्हा सांगली), सुरेश गावकर (वय 34 रा. कणबर्गी) व अन्य तिघे किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, आयशर (एमएचडीटी 4036) हा अहमदाबादहून हुबळीकडे चालला होता. दरम्यान, तवंदी घाटात दुसऱ्या अवघड वळणावर तुमकुरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक (केए 06 एबी 1167) चालक मोहीम खान याचा ताबा सुटल्याने त्याची समोरील दूध वाहतूक करणाऱ्या टेम्पोला तसेच आयशरला जोराची धडक बसली. यानंतर ट्रक उलटला. यावेळी ट्रकच्या पाठीमागून येत असलेला ट्रक (केए 01-4209) व कार (केए 23 एन 6789) यांचाही अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच अवताडे कंपनीचे अधिकारी विजय दाईंगडे, अक्षय सारापुरे तसेच निपाणी शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमादेवी, हवालदार के. बी. द•ाr, रमेश नाईक, मंजुनाथ कल्याणी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काहीकाळ खोळंबली होती. परंतु, पोलीस व अवताडे कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली. अपघातामधील सर्व जखमींना 108 रुग्णवाहिकेतून महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद निपाणी शहर पोलीस स्थानकात झाली असून अधिक तपास निपाणी शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमादेवी करीत आहेत.









