बुधवारी दुचाकीच्या डिक्कीतून लांबविली होती रक्कम
प्रतिनिधी/ बेळगाव
मार्केट यार्ड येथील एका अडत दुकानासमोर उभ्या करण्यात आलेल्या दुचाकीच्या डिक्कीतून दीड लाख रुपये पळविणाऱ्या युवकाला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याजवळून 68 हजार 500 रुपये जप्त करण्यात आले आहेत.
शाहनवाज इब्राहिम घोलवाले (वय 42) रा. घी गल्ली, बेळगाव असे त्याचे नाव आहे. तो एका फूटवेअर दुकानात सेल्समन आहे. गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसीचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ कब्बुरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
बुधवार दि. 24 जानेवारी रोजी सकाळी मार्केट यार्ड परिसरात खरेदीसाठी आलेल्या लोंढा येथील कांदा-बटाटा व्यापारी राजू व्हिक्टर डिकॉस्टा यांच्या दुचाकीतील डिक्कीतून 1 लाख 45 हजार रुपये पळविण्यात आले होते. मार्केट यार्ड येथील राजदीप ट्रेडर्स या अडत दुकानासमोर घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती.
पोलीस निरीक्षक विश्वनाथ कब्बुरी, उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री, त्रिवेणी नाटीकर, किरण होनकट्टी, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी. के. मिटगार, व्ही. डी. बाबानगर, डी. सी. सागर, बसवराज बाणसे, केंपण्णा दोडमनी, नामदेव लमाणी व त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन दिवसांत संशयिताच्या मुसक्या आवळून त्याच्याजवळून रोकड जप्त केली आहे.









