वरिष्ठांच्या स्पर्धेत पदार्पणातच यश, भारताला एकूण दोन पदके, पदकतक्त्यात सातवे स्थान
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताची युवा महिला नेमबाज निश्चलने रिओ डी जानेरो येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 50 मी. रायफल 3 पोझिशन्समध्ये रौप्यपदक पटकावले. भारताने एकूण 2 पदकांसह सातवे स्थान मिळविले.
सोमवारी शेवटच्या दिवशी तिने भारताला दुसरे पदक मिळवून दिले. तिची ही वरिष्ठ वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची पहिलीच वेळ असल्याने तिची कामगिरी कौतुकास्पद ठरली आहे. 19 वर्षीय निश्चलने नॉर्वेच्या जीनेट हेग ड्युस्टॅडनंतर दुसरे स्थान मिळविताना अंतिम लढतीत 458.0 गुण मिळविले. ड्युस्टॅड ही एअर रायफल युरोपियन चॅम्पियन आणि 300 मी. 3 पी वर्ल्ड चॅम्पियन आहे. आयएसएसएफ वर्ल्ड कपमध्ये तिने आतापर्यंत 12 पदके मिळविली असून त्यात 5 सुवर्णपदकांचा समावेश आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिने चौथे स्थान मिळविले होते.
निश्चल जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याचे दिसून आले. तिने पात्रता फेरीत राष्ट्रीय विक्रमही मागे टाकला. ‘माझी ही पहिलीच वर्ल्ड कप स्पर्धा असून त्यात पदक मिळविता आल्याने मी खूप खुश आहे,’ असे ती म्हणाली.
पहिल्या दोन राऊंडमध्ये एकूण 73 स्पर्धकांनी भाग घेतला होता, त्यापैकी 18 नेमबाज एलिमिनेशन राऊंडमध्ये बाहेर पडले. निश्चलने रिले वनमध्ये 587 गुण नोंदवत पात्रता फेरीत स्थान मिळविले. तिच्यासह अंजुम मोदगिल व आयुषी पोद्दार यांनीही रिले 2 मध्ये अपेक्षित कामगिरी करीत पात्रता फेरीत स्थान मिळविले. पात्रता फेरीत प्रोन पोझिशनमध्ये पूर्ण 200 गुण घेतले तर एकूण 592 गुण नोंदवले. गेल्या वर्षी अंजुम चोप्राने कैरोत झालेल्या प्रेसिडेंट चषक स्पर्धेत 591 गुणांचा नोंदवलेला विक्रम तिने मागे टाकला. येथे मात्र अंजुमला 586 गुणच नोंदवता आल्याने तिला दहावे स्थान मिळाले. त्यामुळे अंतिम फेरीसाठी ती पात्र ठरू शकली नाही.
अंतिम फेरीत सर्व तुल्यबळ नेमबाज होत्या. ड्युस्टॅडव्यतिरिक्त पात्रता फेरीत अव्वल स्थान (594) मिळविणारी चीनची वर्ल्ड चॅम्पियन वनरू मियाव, 2018 युथ ऑलिम्पिक चॅम्पियन डेन्मार्कची स्टेफनी ग्रंडसोयी, इटलीची सोफिया सेकारेल्टो, पोलंडची अनेटा स्टॅन्कीविझ यांचाही समावेश होता. 45 शॉट्स अंतिम फेरीत निश्चलने ड्युस्टॅडच्या तोडीस तोड प्रदर्शन केले. नीलिंगच्या 15 शॉट्सनंतर निश्चल तिच्यापेक्षा केवळ 0.1 गुणाने मागे होती. नंतरच्या प्रोन पोझिशनमध्येही हीच स्थिती राहिली. स्टँडिंग पोझिशनमध्ये युक्रेनची व्हिक्टोरिया सुखोरुकोव्हा व स्विसची चियारा लिऑन पहिल्या दहा शॉट्सनंतरच बाहेर पडल्या. यावेळी ड्युस्टॅडने निश्चिलवर 0.7 गुणांची आघाडी घेतली. नंतर ही आघाडी 1.1 अशी वाढली. 44 व्या शॉटनंतर स्टेफनी ग्रंडसोयीने कमी गुण नोंदवल्याने निश्चलचे रौप्य निश्चित झाले आणि स्टेफनीला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
पुरुषांमध्ये भारताच्या गुरप्रीत सिंगने पुरुषांच्या 25 मी. रॅपिड फायर पिस्तुल नेमबाजीत 574 गुण नोंदवत 15 वे स्थान मिळविले. या स्पर्धेसाठी भारताने 16 सदस्यीय संघ पाठविला होता. त्यांनी एक सुवर्ण व एक रौप्य अशी कमाई करीत सातवे स्थान मिळविले. इलावेनिल वलरिवनने महिलांच्या 10 मी. एअर रायफलचे सुवर्ण मिळविले. राही सरनोबत व चैन सिंग यांचाही या स्पर्धेत सहभाग होता, पण त्यांना पदक मिळविण्यात अपयश आले. राहीची अंतिम फेरी अगदी थोडक्यात हुकली तर चैन सिंगला केवळ एक गुण कमी पडला.









