काणकोणातील प्रकार, उशिरा मिळाले ‘कॉल लेटर’
काणकोण : टपाल कार्यालयाच्या हलगर्जीपणामुळे काणकोणच्या एका युवकाला नोकरीची संधी गमवावी लागली असल्याचे उघडकीस आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाळोळे येथील सदर युवकाला गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळामधील अभियंत्याच्या जागेच्या मुलाखतीसाठी दि. 27 जुलै रोजी कॉल लेटर पाठविण्यात आले होते. त्या जागेसाठी दि. 18 ऑगस्ट रोजी दुपारी 2.30 पासून साळगाव येथील कार्यालयात मुलाखती ठेवण्यात आल्या होत्या. सदर कॉल लेटर दि. 3 ऑगस्ट रोजी काणकोणच्या टपाल कार्यालयात पोहोचले आणि त्यावर काणकोणच्या टपाल कार्यालयाने मारलेला शिक्काही आहे. मात्र ज्या युवकाला हे मुलाखतीसाठी येण्यास सांगणारे पत्र पाठविण्यात आले होते त्याला ते दि. 19 ऑगस्ट रोजी देण्यात आले. तोपर्यंत मुलाखतीचा दिवस व वेळ टळून गेली होती. यासंबंधी सदर युवकाने काणकोणच्या टपाल कार्यालयात चौकशी केली असता पोस्टमन नसल्यामुळे टपालाचा बटवडा होऊ शकला नाही असे त्या कार्यालयातून सुनावण्यात आल्याचा दावा सदर युवकाच्या पालकाने केला आहे. एका बाजूने येथील बेकार युवक रोजगाराच्या प्रतीक्षेत असताना केवळ टपाल कार्यालयाच्या बेपर्वाईमुळे एका शिक्षित युवकाला नोकरीची संधी गमवावी लागली असल्याचे दिसून आलेले आहे.









