म्हापसा : गोवा कोंकणी अकादमी व ज्ञानप्रसारक मंडळ महाविद्यालय आसगाव म्हापसा यांच्या संयुक्त विद्यमाने 22 वे युवा कोंकणी साहित्य संमेलन दि. 17 व दि. 18 मार्च रोजी आयोजित केल्याची माहिती गोवा कोंकणी अकादमीच्या सदस्य सचिव मेघना शेटगांवकर यांनी दिली. ज्ञानप्रसारक मंडळ महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्यावेळी त्यांच्यासमवेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप आरोलकर, प्रा. प्रशांती तळपणकर व प्रा. पुऊषोत्तम वेर्लेकर उपस्थित होते. शुक्रवार दि. 17 रोजी सकाळी 10 वा. कोंकणी प्रांतातील रत्नागिरी जिह्यात जन्म घेतलेले महाराष्ट्रातील सुविख्यात उर्दु व इंग्रजी युवा साहित्यिक रहमान अब्नास यांच्याहस्ते 22 व्या युवा कोंकणी साहित्य संमेलनाचे उद्घाटन होईल. यावेळी संमेलनाध्यक्ष म्हणून साहित्यिक व पत्रकार मार्पूस गोन्साल्वीस व विशेष अथिती म्हणून ज्ञानप्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीकृष्ण पोकळे, गोवा कोंकणी अकादमीचे अध्यक्ष अऊण साखरदांडे, उपाध्यक्ष वसंत सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप आरोलकर उपस्थित राहणार आहेत. स्वागताध्यक्षपदी डॉ. दिलीप आरोलकर, युवा लेखक व अध्यापक पुऊषोत्तम वेर्लेकर यांची कार्याध्यक्षपदी निवड झाल्याची माहिती अध्यापिका प्रशांती तळपणकर हिने दिली. स्वगताध्यक्ष व प्राचार्य डॉ. दिलीप आरोलकर यानी संमेलनाच्या कार्यक्रमाची माहिती देताना सांगितले संमेलनाच्या संपूर्ण परिसराला नागेश करमली नगर असे नाव देण्यात आले असून प्रमुख मंडपास नारायण मावजो यांचे नाव देण्यात आले आहे. तसेच व्यासपीठ व सभागृहांना महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक व कोंकणी लेखक एडवर्ड डिमिला, प्रकाश पाडगावकर, जयमाला दणायम, रजनी भेंब्रे, रेवणीसिद्ध नायक यांची नावे देण्यात आली आहे.
संमेलनाच्या उद्घाटन समारंभात युवा लेखक सुप्रिया काणकोणकर यांच्या कविता संग्रहाचे प्रकाशन तसेच गेल्या व वर्षी बक्षिसपात्र ठरलेल्या युवा साहित्यिकांच्या साहित्याचा समावेश असलेले युवांकुर या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. पडवेर या अभिनव कार्यक्रमात गोव्याचे दोन लेखक दत्ता दामोदर नायक व श्रीमती नुतन साखरदांडे यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम होईल. सान्वी खांडेपारकर व गौरांग भांडिये या मुलाखती घेतील. तसेच युवा साहित्य पुरस्कार विजेते नरेश नायक यांची युवा लेखक गोरख शिरसाट मुलाखत घेतील. बीजभाषण व कार्यशाळा या उपक्रमात लेखक व प्रकाशक दिनेश मणेरकर युवा साहित्यिकाना मार्गदर्शन करणार आहेत. सध्या 4.30 वा कवी संमेलन या संमेलनाच्या अध्यक्षपदी दिलीप धारगळकर असणार आहे. त्यानंतर सध्या 6 वा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. शनिवार दि. 18 रोजी सकाळी 9.30 वाजता कविता कथा ब्लॉगिंग व बालसाहित्य या कार्यशाळेत श्रीमती हेमा नायक , श्रीमती मीना काकोडकर, श्रीमती राधा भावे, नारायण महाले, लुझेस गोम्स, श्रीमती रत्नमाला दिवकर, रमेश घाडी, गोपीनाथ गावंस, चेतन आचार्य, सुभाष कामळकर, अत्वेला सिंगवाळ , युगांक नायक हे साहित्यिक युवा लेखकाला मार्गदर्शन करतील. दुपारी 2.30 वाजता संमेलनाचा समारोप समारंभ होईल. प्रा. भास्कर नायक खास अतिथी म्हणून असतील तर संमेलनाध्यक्ष मार्कुस गोन्साल्वीस, स्वागताध्यक्ष डॉ. दिलीप आरोलकर, कार्याध्यक्ष प्रा पुऊषत्तम वेर्लेकर व कोकणी अकादमीचे उपाध्यक्ष वसंत सावंत याच्या उपस्थितीत समारोप होईल. संमेलनाला 150 प्रतिनिधींची नोंदणी झाली आहे, अशी माहिती प्रशांती तळपणकर यांनी दिली.









