वृत्तसंस्था/ कोल्लम
केरळच्या कोल्लममध्ये युवकाने पूर्वाश्रमीच्या प्रेयसीच्या भावाची चाकूने वार करत हत्या केली आहे. तर हल्ल्यात प्रेयसीचा पिता जखमी झाला आहे. ही घटना उलियाकोवी भागात घडली असून याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. आरोपी युवकाचे नाव तेजस राज (23 वर्षे) आणि मृत युवकाचे नाव फेबिन जॉर्ज गोमेज (21 वर्षे) आहे. हत्येनंतर तेजसने रेल्वेसमोर उडी घेत स्वत:चे आयुष्य संपविले आहे. त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
तेजस हा बेरोजगार होता, तर युवतीला बँकेत नोकरी लागली होती. परिवाराच्या दबावापोटी युवतीने तेजससोबत ब्रेकअप केला होता. यामुळे संतापलेल्या तेजसने हा गुन्हा केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपी तेजस कारने पूर्वाश्रमीच्या प्रेयसीच्या घरी पोहोचला होता, तेथे त्याचा प्रेयसीच्या परिवारासोबत वाद झाला. याचदरम्यान त्याने फेबिनवर चाकूने वार केले. तर मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात फेबिनचे वडिलही जखमी झाले आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यात गंभीर जखमी फेबिन धावत असल्याचे आणि काही क्षणांनी कोसळत असल्याचे दिसून येते. चाकूने हल्ला केल्यावर तेजसने कारसमवेत तेथून पलायन केले. तर गंभीर जखमी फेबिन आणि त्याच्या पित्याला रुग्णालयात हलविण्यात आले, जेथे फेबिनला मृत घोषित करण्यात आले.
घटनास्थळावरून पळ काढल्यावर सुमारे 3 किलोमीटर अंतरारवील कडप्पाक्कडा भागात तेजसने धावत्या रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली आहे. तेजसने पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी लेखी परिक्षेत यश मिळविले होते, परंतु शारीरिक चाचणीत तो अपात्र ठरला होता. तेव्हापासून त्याच्या प्रेयसीने त्याच्यापासून अंतर राखले होते.









