सुकेकुळण-धारगळ येथे महामार्गावरील घटना, दोघेजण जखमी

प्रतिनिधी /पेडणे
सुकेकुळण-धारगळ येथे राष्ट्रीय महामार्ग 66 वर स्विफ्ट कार आणि मोपा लिंक रस्त्याच्या कामासाठी आणण्यात आलेल्या पेन यांच्यात भीषण अपघात होऊन एक ठार व दोन जण जखमी झाले. जखमींना म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. रिकी रवी बिनावत (वय 26, रा. सतवननगर पुणे) असे मयत युवकाचे नाव आहे.
सविस्तर माहितीनुसार सुकेकुळण धारगळ येथील राष्ट्रीय महामार्ग 66 वर पणजी मार्गे पुणे येथे जाणारी स्विफ्ट कार एम. एच 12, एच झेड. 2419 व पेन यांच्यात सकाळी आठच्या सुमारास अपघात झाला. यामध्ये पुणे येथील रिकी बिनावत जागीच ठार झाला, तर निधी गोडसे (वय 27, रा. कराड) व सुनील (रा. कराड) हे या अपघातात जखमी झाले. मोपा विमानतळासाठी लिंक रस्ता करणाऱया कंपनीची पेन सर्विस रस्त्याच्या खाली बाजूला वळवण्यात आली होती. त्याचवेळी वेगाने येणाऱया स्विफ्ट कारने या पेनला धडक दिली. त्यात रिकी रवी बिनावत हा जागीच ठार झाला.
आमदार प्रवीण आर्लेकर घटनास्थळी दाखल
अपघाताची माहिती स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताबाबत विचारपूस केली. पेडणे पोलिसांना माहिती मिळताच पेडणे पोलीस निरीक्षक दत्ताराम राऊत तसेच उपनिरीक्षक हरिष वायंगणकर, उपनिरीक्षक विवेक हळर्णकर तसेच अन्य पोलीस, वाहतूक विभागाचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. उपनिरीक्षक हरिष वायंगणकर यांनी या घटनेचा पंचनामा करून जखमीना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, तर ठार झालेला युवकाचा मृतदेह गोवा वैद्यकीय इस्पितळ बांबोळी येथे पाठवण्यात आला.









