तीव्र वळणावर गाडी 800 दरीत कोसळली, मृत युवक सज्जनगड येथील
वार्ताहर/ परळी
सज्जनगड येथे गुरुवारी रात्री 12.00 वाजण्याच्या सुमारास साताऱयाहून सज्जनगडकडे निघालेली तवेरा गाडी सज्जनगडचा घाट चढत असताना तीव्र वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने गाडी 800 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात अजित सुर्यकांत शिंगरे (वय 32 रा. सज्जनगड) याचा जागीच मृत्यू झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, रात्री 12 वाजण्याच्या सुमारास सज्जनगड घाटात एक प्रकाशसदृश्य गोळा पडल्याचा भास हा कारी येथील काही युवकांना झाला. त्यांनी तत्काळ 108 ला संपर्क साधत घटना सांगितली. त्यानंतर 108 तसेच पोलीस यंत्रणा सज्जनगड घाट परिसरात पोहोचली. नागरिकांनी दरीच्या दिशेने धाव घेतली असता गाडीचा भीषण अपघात झाल्याचे निदर्शनास आले. या अपघातात अजित शिंगरे याचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, सातारा तालुका पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी आपल्या कर्मचाऱयांसह घटनास्थळी येऊन अजित शिंगरे याचा मृतदेह स्थानिक नागरिकांच्या मदतीने रात्री 3.30 ते 4.00 वाजण्याच्या सुमारास बाहेर काढण्यात यश आले. हा मृतदेह शवविच्छेदनासाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालय दाखल केला. अजित शिंगरे याच्या पश्चात एक भाऊ व एक बहीण असा परिवार आहे. या अपघाताची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.








