महाराष्ट्रच्या हिरकणीने ठोकरले नेरुलच्या सुदीपला
पेडणे : धारगळ येथील दोन खांब जंक्शनजवळ राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्राची एसटी बस व दुचाकी यांच्यात बुधवारी दुपारी भीषण अपघात झाला. यामध्ये भाटीवाडा नेऊल बार्देश येथील सुदीप रवी पैकर या 18 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. पेडणेहून पणजीच्या दिशेने जाणाऱ्या ‘हिरकणी’ या प्रवासी बसने दुचाकीस्वाराला मागून धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला. सुदीप आपल्या जीए 03 ए जी 5628 दुचाकीने राष्ट्रीय महामार्गावरून म्हापसाच्या दिशेने जात होता. धारगळ येथे आला असता महाराष्ट्र परिवहन विभागाची ‘हिरकणी’ ही एम. एच. 14 के. 9753 ही प्रवासी बस मागून भरधाववेगाने आली आणि तिने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात तो रस्त्यावर कोसळला व एसटीच्या चाकाखाली सापडला आणि जागीच मृत्यू झाला.
सुदीप हा मोपा विमानतळावर ‘गोल्ड मॅन’ म्हणून कामाला होता. आपल्या घरी जात असतानाच हा अपघात घडला, अशी माहिती पेडणे पोलिसांनी दिली. या अपघातामुळे काही काळ महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. अपघातानंतर स्थानिकांनी पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर पोलिस घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला आणि वाहतूक सुरळीत केली. त्या युवकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठविला. पेडणे पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेल्या ‘हिरकणी’ बस चालकावर पेडणे पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून त्याची चौकशी सुरू केली आहे. या अपघाताबाबत अधिक तपास सुरू असून सीसीटीव्ही फुटेजचीही पाहणी केली जात आहे. दरम्यान, या अपघातप्रकरणी बसचालक उदयसिंग पवार (कोल्हापूर) याला पेडणे पोलिसांनी अटक केली आहे.









