सातारा :
सातारा शहरातील पारंगे चौकात शनिवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकांचा समोरासमोर अपघात झाला. या अपघात एकाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या दुचाकीवरील युवकावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुभम काशीनाथ शिंदे (वय 25, रा. दरे ता. कोरेगाव) असे मयत युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शनिवारी रात्री शुभम शिंदे हा घरी जाण्यासाठी दुचाकीवरून निघाला. वाहनांची संख्या कमी असल्याने तो भरधाव वेगाने दुचाकी चालवत पारंगे चौकात आला. याच वेळी राहुल खाडे (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) हा सुद्धा भरधाव वेगाने दुचाकी चालवत आला. यावेळी दोघांच्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकींचा चुराडा झाला. दोघेही रस्त्यावर उडून पडले. दोघांच्या डोक्याला, हाता-पायाला मार लागल्याने गंभीर जखमी झाले. परिसरातील लोकांना या अपघाताची माहिती शाहूपुरी पोलिसांना दिली.
पोलिसांनी शुभम याला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वी तो मृत झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. तर राहुल याला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत..








