पुत्राच्या मित्राचा आढळला मृतदेह : घरात सापडले पिस्तुल
वृत्तसंस्था/ लखनौ
केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांच्या लखनौ येथील निवासस्थानात एका युवकाची हत्या झाली आहे. या युवकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात बेडनजीक आढळून आला आहे. या युवकाच्या डोक्यावर गोळी झाडण्यात आली होती. तर हत्येसाठी मंत्र्यांचा पुत्र विकास उर्फ आशू याच्या परवानायुक्त पिस्तुलचा वापर करण्यात आला आहे. मृतदेहाजवळच हे पिस्तुल सापडले आहे.

मृत युवकाचे नाव विनय श्रीवास्तव असून तो 30 वर्षांचा होता. विनय हा विकास उर्फ आशूचा मित्र होता. ज्या घरात हत्या झाली तेथे मंत्र्यांचा मुलगा राहत होता. परंतु हत्येच्या घटनेवेळी विकास घरात नव्हता असे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्र्यांनी दिले आहे.
गुरुवारी रात्री मंत्र्याच्या पुत्राच्या घरात 6 जण आले होते. रात्री उशिरा हत्येची घटना घडली आहे. मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून डोक्यावर गोळी झाडण्यात आली होती. ही हत्या कुणी आणि का केली याचा तपास केला जात असल्याचे पोलीस उपायुक्त राहुल राज यांनी सांगितले आहे.
कटांतर्गत हत्या : भावाचा आरोप
विनय हा बहुतांश वेळ मंत्र्यांचा पुत्र विकाससोबत असायचा. माझ्या भावाला कटाच्या अंतर्गत ठार करण्यात आले आहे. मंत्र्यांचा पुत्र नेहमीच स्वत:सोबत पिस्तुल बाळगायचा, मग गुरुवारी त्याने ते का सोबत घेतले नाही? प्रत्येकवेळी तो विनयला सोबत घेऊन जायचा मग गुरुवारी विनय त्याच्यासोबत का नव्हता असे प्रश्न मृत युवकाच्या भावाने उपस्थित केले आहेत. तर मंत्री कौशल किशोर यांनी हत्येमागे कुठलाही कट नसल्याचा दावा केला आहे. माझा पुत्र विकास विमानाद्वारे दिल्लीत गेला होता. दुसऱ्या राज्यात परवाना मान्य नसल्याने त्याने घरीच पिस्तुल ठेवले होते असा दावा मंत्र्यांनी केला आहे.
भूखंडावरून वाद
विनय श्रीवास्तव याचा मृत्यू ज्या बंगल्यात झाला, त्याच्यानजीकचा भूखंड विकास किशोर यांनी त्याला दिला होता. विकास किशोरकडून प्राप्त भूखंडावर विनय कार वॉशिंग प्रकल्प निर्माण करू पाहत होता. या भूखंडावरून 31 ऑगस्ट रोजी रात्री अंकित वर्मा, अजय रावत, शमीम गाजी आणि इतर लोकांसोबत त्याचा वाद झाला होता. या वादानंतर विनयची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचे समजते. पोलिसांनी तीन आरोपींना याप्रकरणी ताब्यात घेतले आहे.









