अन्य तिघे जखमी : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी रात्री घडला अपघात
बेळगाव : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील बेन्नाळीजवळ गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या वाहन अपघातात चव्हाट गल्लीचा तरुण जागीच ठार झाला तर अन्य तिघे जण जखमी झाले. भरधाव कार महामार्गावर उलटल्याने हा अपघात घडला आहे. काकती पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे. प्रणव चंद्रकांत संभाजीचे (वय 24) मूळचा राहणार चव्हाट गल्ली, सध्या राहणार महावीर कॉलनी, मारुतीनगर असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. कारमधील आर्यश्री अनुराग रंजन (वय 23) राहणार बिहार, इतेश सदानंद आरोस्कर (वय 25) राहणार ब्रह्मनगर, पिरनवाडी, श्रीलक्ष्मी राजेश यलिगार (वय 23) राहणार वैभवनगर अशी जखमींची नावे आहेत. घटनेची माहिती समजताच काकतीचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. जखमींवर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. आर्यश्री ही वैद्यकीय विद्यार्थिनी आहे. हे सर्वजण होनग्याजवळील एका ढाब्यावर जेवणासाठी गेले होते. गुरुवार दि. 28 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12.30 ते 2.40 यावेळेत हा अपघात झाला आहे. जखमी इतेशवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
नियंत्रण सुटल्याने दुर्घटना
इतेश हा कार चालवत होता. कारवरील नियंत्रण सुटल्याने बेन्नाळीजवळ कार उलटली. तीन ते चारवेळा पलटी होऊन कार सर्व्हिस रोडवर पोहोचली. या अपघातात प्रणव जागीच ठार झाला. प्रणव हा व्यवसायाने फोटोग्राफर होता. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे. सोमवार दि. 1 सप्टेंबर रोजी चव्हाट गल्ली स्मशानभूमीत रक्षाविसर्जन होणार आहे.









