मारहाणकर्त्यांचे सीसीटीव्ही उपलब्ध
बेळगाव : स्पेअरपार्ट दुकानात काम करणाऱ्या एका तरुणाला उचलून नेऊन अनगोळ येथे त्याच्यावर हल्ला करण्यात आला आहे. बुधवारी दुपारी ही घटना घडली आहे. रात्री उशिरापर्यंत यासंबंधी पोलिसात फिर्याद दाखल झाली नव्हती. शिवराज तानाजी मोरे (वय 24) रा. कामत गल्ली असे जखमी तरुणाचे नाव आहे. काठीने त्याला बेदम मारहाण करण्यात आली असून त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. घटनेची माहिती मिळताच सिव्हिल हॉस्पिटलला भेट देऊन टिळकवाडी पोलिसांनी यासंबंधीची माहिती घेतली आहे. शिवराज हा कोनवाळ गल्ली येथील एका स्पेअरपार्टच्या दुकानात काम करतो. रामनवमीच्या मिरवणुकीच्या दिवशी रात्री टिळक चौक परिसरात झेंडा फिरवताना वादावादी झाली होती.
त्यावेळीही त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न झाला होता. तो निसटला होता. बुधवार दि. 9 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता शिवराज काम करीत असलेल्या दुकानात येऊन त्याला बोलावून घेण्यात आले व दुचाकीवरून अनगोळला नेण्यात आले. काटा ग्राऊंडजवळ त्याला मारहाण करण्यात आली आहे. आपल्याला मारहाण करणारे अनगोळ परिसरातील असल्याचे जखमी तरुणाने सांगितले. यासंबंधी बुधवारी रात्री टिळकवाडी पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता एफआयआर दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. कोनवाळ गल्ली परिसरातून शिवराजला दुचाकीवरून नेतानाचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले असून फुटेजवरून मारहाण करणाऱ्यांची ओळखही पटली आहे.









