दुर्गामाता दौडमध्ये हजारोंची उपस्थिती : राजमाता जिजाऊंचे वंशज दौडमधील शिस्तीमुळे गेले भारावून
बेळगाव : ‘शिवबानं सांगावा धाडलाय रं, देशासाठी जगायचं रं’, ‘शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती’ अशी स्फूर्तिगीते म्हणत बुधवारी नवव्या दिवशी दुर्गामाता दौडमध्ये शेकडोंची उपस्थिती दिसून आली. युवा पिढीमध्ये देव, देश आणि धर्माविषयी नवीन ऊर्जा निर्माण करण्यासाठी दुर्गामाता दौड काढली जात असून त्याला शिवभक्तांनीही तितकाच भव्य प्रतिसाद दिला आहे. त्यामुळेच स्वराज्यात आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या मावळ्यांचे वंशजदेखील बेळगावमधील दुर्गामाता दौड पाहून भारावून जात असल्याचे दिसून आले.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने काढण्यात आलेल्या नवव्या दिवशीच्या दौडला ताशिलदार गल्ली येथील सोमनाथ मंदिरापासून प्रारंभ झाला. राजमाता जिजाऊ यांचे वडील श्रीमंत राजे लखोजीराव जाधवराव सिंदखेड राजा यांचे सोळावे वंशज व सरसेनापती धनाजीराव शंभूसिंग जाधवराव यांचे बारावे वंशज राजे अमरसिंह उदयसिंह जाधवराव यांच्या हस्ते ध्वज चढविण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक प्रकाश चौगुले तसेच डॉ. कोकणे उपस्थित होते. प्रेरणा मंत्र म्हणून बुधवारच्या दौडला सुरुवात झाली.
ताशिलदार गल्ली, फुलबाग गल्ली, पाटील गल्ली, भांदूर गल्ली या परिसरात दौडचे उत्साही वातावरणात स्वागत झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अनेक देखावे सादर करण्यात आले होते. विशेषत: बालचमूंनी सादर केलेल्या देखाव्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. शनिमंदिर येथे दौडची सांगता झाली. यावेळी राजे अमरसिंह जाधवराव यांचा शिवप्रतिष्ठानचे प्रांतप्रमुख किरण गावडे यांच्या हस्ते सत्कार झाला. या कार्यक्रमाला रमेश रायजादे यासह इतर उपस्थित होते.
तुम्ही विचारांचे वारसदार
धारकऱ्यांना मार्गदर्शन करताना अमरसिंह जाधवराव म्हणाले, महाराष्ट्रापेक्षाही भव्यदिव्यता ही आज बेळगावमध्ये पाहायला मिळाली. शिस्तबद्ध काढण्यात आलेली दौड पाहून मन भारावून गेले. आम्ही रक्ताचे वारसदार असलो तरी तुम्ही शिवरायांच्या मावळ्यांच्या विचारांचे वारसदार आहात, असे उद्गार त्यांनी काढले. स्वराज्याचे आणि कर्नाटकाचे विशेष संबंध आहेत. राजमाता जिजाऊंचे वडील लखोजीराव यांचे नातू संताजी व जिजाऊंचे मोठे पुत्र संभाजीराजे हे याच भूमीवर शहीद झाले. धनाजीराव यांचे बंधू चंद्रसेन जाधवराव यांना बिदर-भालकी येथील अंमल देण्यात आला होता, अशीही आठवण त्यांनी यावेळी करून दिली.









