23 किलो गांजा जप्त : मच्छेतील तिघा पेडलरना अटक : अमलीपदार्थ विक्रीच्या रॅकेटचे कंबरडे मोडण्याचा निर्धार
बेळगाव : नशामुक्त बेळगावसाठी पोलिसांनी कारवाईचे सत्र सुरूच ठेवले आहे. अमलीपदार्थांची विक्री करणाऱ्यांची पाळेमुळे खणण्याचे काम हाती घेण्यात आले असून या अभियानाचाच एक भाग म्हणून उद्यमबाग पोलिसांनी शनिवारी मच्छे येथील तीन तरुणांना अटक करून 23 किलो 840 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी रविवारी सकाळी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मटका, जुगाराबरोबरच अमलीपदार्थांची विक्री करणारे व सेवन करणाऱ्यांविरुद्ध मोहीम सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. यावर्षीची उद्यमबाग पोलिसांनी केलेली ही मोठी कारवाई आहे.
आकाश दिलीप दोडमनी (वय 25), निखिल गोपाल सोमजीचे (वय 21), वीरेश चंद्रय्या हिरेमठ (वय 19) तिघेही रा. जयनगर-मच्छे अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या जवळून 6 लाख 90 हजार रुपये किमतीचा 23 किलो 840 ग्रॅम गांजा, गांजा वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली सुमारे 3 लाख रुपये किमतीची वेर्णा कार, दोन मोबाईल संच, अकराशे रुपये रोख रक्कम अशी एकूण 10 लाख 11 हजार 100 रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. खडेबाजारचे एसीपी शेखरप्पा एच. यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यमबागचे पोलीस निरीक्षक डी. के. पाटील, उपनिरीक्षक किरण होनकट्टी, हवालदार आर. एस. पुजारी, टी. बी. कुंचनूर, हणमंत विभुती, आनंद खोत, महेश वडेयर, तांत्रिक विभागाचे रमेश अक्की, महादेव काशिद आदींनी ही कारवाई केली आहे.
तिघांची रवानगी कारागृहात
उद्यमबाग येथील एकेपी फॅक्टरीजवळ शनिवारी ही कारवाई करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या तिघा जणांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून न्यायालयाच्या आदेशावरून त्यांची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. त्यांच्या जबानीतून बेळगाव परिसरात पसरलेले अमलीपदार्थांचे जाळे व त्याची कार्यपद्धत उघड झाली आहे. त्या दिशेने तपास करण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. बेळगाव परिसरात विक्रीसाठी हा साठा मागवण्यात आला होता. महाराष्ट्रातून गांजा मागवल्याची कबुली या त्रिकुटाने दिली आहे. बेळगावला गांजाचा पुरवठा कोठून होतो? मागणी आणि पुरवठा याचा ताळमेळ कसा जमवला जातो? याची संपूर्ण जंत्री जमविण्यात येत असून गांजा नेटवर्कची पाळेमुळे खणून काढण्याचे काम हाती घेतले आहे. कोणत्याही परिस्थितीत अमलीपदार्थांची विक्री, मटका, जुगार आदी अपप्रवृत्ती खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे.
गांजा नेटवर्कचे कंबरडे मोडणार
चालूवर्षी आतापर्यंत अमलीपदार्थ विकणाऱ्यांविरुद्ध 20 गुन्हे दाखल झाले आहेत. उद्यमबाग पोलिसांनी केलेली कारवाई 21 वी असून 42 जणांना अटक करून 17 किलो 232 ग्रॅम 552 मिली अमलीपदार्थ जप्त करण्यात आले होते. मात्र, या एकाच प्रकरणात तिघा जणांना अटक करून 23 किलो 840 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. संपूर्ण गांजा नेटवर्कचे कंबरडे मोडण्यासाठी आपली कारवाई सुरू असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. अमलीपदार्थांविरुद्ध गेल्या तीन वर्षात झालेली कारवाई लक्षात घेता तीन वर्षातील मोठी कारवाई उद्यमबाग पोलिसांनी केली आहे. 2023 ला संपूर्ण वर्षभरात 23 गुन्हे दाखल करून 34 आरोपींना अटक करून 12 किलो 679 ग्रॅम अमलीपदार्थ जप्त करण्यात आले होते. 2024 मध्ये 25 गुन्हे दाखल करून 39 जणांना अटक करून एकूण 11 किलो 788 ग्रॅम 844 मिली अमलीपदार्थ जप्त करण्यात आले होते.
नशेच्या व्यापाराविरुद्ध मोहीम
तरुणाईला व्यसनाधीन बनविणाऱ्या व त्यांचे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या नशेच्या व्यापाराविरुद्ध मोहीम सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे सांगतानाच पोलीस आयुक्तांनी प्रत्येक पालकानेही आपल्या तरुण मुलांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे. आम्ही केवळ गुन्हेगारांवर कारवाई करून थांबणार नाही. शाळा कॉलेजमध्ये अमलीपदार्थांच्या दुष्परिणामांविरुद्ध जागृतीची मोहीमही सुरू केली आहे. प्रत्येक कारवाईनंतर नशेचा बाजार कसा चालतो? बेळगावला कोठून गांजा व इतर अमलीपदार्थांचा पुरवठा होतो? आदींविषयी सतत माहिती मिळते आहे. संपूर्ण नेटवर्क मोडीत काढून तरुणाईला नशामुक्त बनविण्याचे उद्दिष्ट आहे. या कामी नागरिकांचेही सहकार्य अपेक्षित आहे. अशा गैरप्रकारांविरुद्ध नागरिकांनी माहिती द्यावी, असे आवाहनही पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी केले आहे.









