रत्नागिरी / प्रवीण जाधव :
तरुण पिढी अमली पदार्थांच्या विळख्यात अडकत चालल्याचे चित्र आहे. महागडी ड्रग्स, गांजा, दारू यांचा वाढता वापर तरुणांच्या आरोग्यासह समाजव्यवस्थेलाही धोका निर्माण करत आहे. शिक्षण, रोजगाराच्या अपुऱ्या संधी, तणाव व संगत या कारणांमुळे युवक अमली पदार्थांना बळी पडत आहेत. जनजागृतीचे कार्यक्रम विविध स्तरावर हाती घेतले जात असले तरी त्याचा फारसा परिणाम होताना दिसत नाही.
जिल्हा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सन २०२३मध्ये अमली पदार्थांसंबंधी जिल्हाभरात ४६ गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये ९१ जणांना अटक करण्यात आली तर ३ कोटी ६७ लाख ४८ हजार ९२७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर २०२४ मध्ये एकूण २५ गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये ३९ जणांना अटक करण्यात आली तर ६४ लाख ७१ हजार ३०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच चालू वर्षामध्ये मे अखेरपर्यंत ३३ गुन्हे दाखल करण्यात आले असून ४२ जणांना अटक व ६ लाख ९९ हजार ६५२ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
पोलीस प्रशासनाने अलीकडेच रत्नागिरीसह परिसरात विविध ठिकाणी छापे टाकून लाखो रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तरुणांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रामुख्याने रत्नागिरी जिल्ह्यात अॅफेन्टामाईन, चरस, टर्की, ब्राऊन हेरॉईन व गांजा या अमली पदार्थांची विक्री प्रामुख्याने होत आहे. बाहेरील जिल्ह्यातून अमली पदार्थ जिल्ह्यात दाखल होत आहेत. विशेषकरुन कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांतून अमली पदार्थाचा पुरवठा होत असल्याचे उघड झाले आहे.
- जनजागृती कार्यक्रमातून तरुणाईचे प्रबोधन
अमली पदार्थाचा दीर्घकालीन वापर मानसिक असंतुलन, शारीरिक आजार तसेच गुन्हेगारी प्रवृत्ती यांना बळ देणारा ठरतो. कुटुंबातील वातावरण ढासळण्यासोबतच समाजात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होते. समाजातील पालकवर्ग, शैक्षणिक संस्था व पोलीस प्रशासन यांनी एकत्र येऊन या विळख्यातून तरुणाईची सुटका करण्यासाठी जनजागृतीपर मोहीमा राबविण्यात येत असतात. रत्नागिरी जिल्हा पोलिसांकडून सन २०२३ मध्ये जिल्हाभरात १०८, २०२४ मध्ये १०७ तर चालू वर्ष २०२५ मध्ये ९३ एकूण जनजागृतीचे कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत.
- अमली पदार्थांच्या विळख्यातून सुटण्यासाठी शालेय व महाविद्यालयीन पातळीवर जनजागृती
शाळा ही समाज घडविण्याची पायाभूत संस्था आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये योग्य मार्गदर्शन करून अमली पदार्याविषयी जागरूकता निर्माण करणे हे अत्यंत गरजेचे आहे. हा उपक्रम सातत्याने राबविला, तर भावी पिढी व्यसनमुक्त व सक्षम घडविणे शक्य होवू शकते. यामुळे शाळा व महाविद्यालयांमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम हाती घेण्यात येत असतात, त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे मात्र तरीदेखील शाळा महाविद्यालय परिसरात समाजकंटक अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येत असल्याचेही दिसून आले आहे.
- पुनर्वसन केंद्रांची सुविधा वाढवणे
तरुणाईला अमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग व सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम राबवले जात आहेत. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना अमली पदार्थाचे दुष्परिणाम समजावून सांगणे व व्यसनापासून दूर ठेवणे हा आहे. असे असले तरी काही तरुण अमली पदार्थांच्या आहारी जातात. अशा वेळी त्यांचे पुनर्वसन करणे गरजचे असते. नेशची लक्षणे दिसताच उशीर समुदपदेशन, वैद्यकीय सल्ला घेणे महत्वाचे असते. तसेच अधिकच नेशच्या आहारी गेल्यास पुनर्वसन केंद्रात दाखल करण्याच्या सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.
- अमली पदार्थांच्या व्यसनामुळे गुन्हेगारी कृत्यांमध्ये वाढ
शहरासह ग्रामीण भागात अशा पदार्थांची सहज उपलब्धता है व्यसनाधिनतेमागील प्रमुख कारण मानलं जात आहे अमली पदार्थाच्या आहारी गेलेली व्यक्ती आरोग्यांच्या समस्येला तोंड देत असताना गुन्हेगारीकडे वळते. अमली पदार्थांचे दर अधिक असल्याने त्यासाठी पैशाची गरज निर्माण होते. यातून चोरी, दरोडे, हिंसाचार आदी प्रकार व्यसनधीन व्यक्तीकडून होत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
- कौटुंबिक स्वास्थ्यही बिघडते
अमली पदार्थाच्या सेवनामुळे मानसिक आरोग्याबरोबर त्या व्यक्तीचे कौटुंबिक स्वास्थही बिघडून जाते. सधन कुटुंबही अमली पदार्थांच्या आहारी गेल्याने आर्थिक अडचणींना सामोरे जात असल्याचे दिसून येते. अमली पदार्थ घेणारी व्यक्तीला आजारपण, मानसिक आजार प्रसंगी मृत्यूसारख्या घटनांही सामोरे जावे लागते. त्यामुळे कुटुंबे उद्धवस्त होत आहेत.
देशविघातक कृत्यांसाठी अमली पदार्थ विक्रीतून मोठ्या प्रमाणावर काळा पैसा निर्माण होत असतो. मोठे रॅकेट यामध्ये कार्यरत असते. या धंद्यातून येणारा पैसा देशविघातक कृत्य करण्यासाठी केला जात असल्याचे यापूर्वीही उघड झाले आहे. अमली पदार्थांच्या विक्रीतून देशविघातक कृत्यू होण्याचा मोठा धोका निर्माण होत असतो.
- कायद्याची कठोर अंमलबजावणी हवी
शासनाकडून अमली पदार्थ विरोधी कायदा करण्यात आला आहे. असे असले तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचेच दिसून येते. अमली पदार्थ विक्री करताना तरुण सापडल्यानंतर त्याने ते कोठून आणले याचा शोध लागत नाही. पोलिसांकडून संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात येत असतो, मात्र अमली पदार्थ विक्री करणारी साखळी तोडून काढण्यात पोलिसांना यश येत नाही त्यामुळे एकाला पकडल्यानंतर नवे तरुण असे पदार्थ विक्रीच्या सापळ्यात अडकत असल्याचे चित्र दिसून येते.
- पालकांनी मुलांवर लक्ष ठेवणे
अमली पदार्थाच्या आहारी गेल्यावर मुलामध्ये बदल दिसून येत असतात. यामध्ये घरातून पैशाची चोरी करणे, खोटे बोलणे, आक्रमक होणे आदी प्रकार समोर येतात. त्यामुळे मुलांशी मोकळेपणाने बोलणे, घरातून वातावरण तणावमुक्त ठेवणे, मित्रांचा गट, हालचाली, मोबाईल, सोशल मिडियावरील मुलांचा वावर याकडे कटाक्षाने लक्ष देणे गरजेचे आहे. यातून मुलांना वाईट मार्गाला जाण्यापासून परावृत्त केले जावू शकते.
विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या व्यसनांपासून रोखण्यासाठी शालेय स्तरावरुन विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये तज्ज्ञांचे मार्गदर्शन, प्रभात फेरी, विधी सेवा प्राधिकरण व पोलीस विभागाचे कार्यक्रम, वक्तृत्व स्पर्धा, विद्यार्थ्यांचे समुपदेशन, पथनाट्य, शालेय परिसरात मार्गदर्शक फलक, तसेच स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अमली पदार्थ विरोधी विद्यार्थ्यांना शपथ देण्यात येते. आतापर्यंत आमच्या शाळा परिस्त्रारात कोणतीही तक्रार अथवा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
-के. डी. कांबळे, (मुख्याध्यापक, शिर्के प्रशाला, रत्नागिरी)







