वर्ल्ड चेस आर्मागेडॉन आशिया ओशेनिया विभागीय स्पर्धा, अंतिम लढतीत उझ्बेकच्या खेळाडूवर मात
वृत्तसंस्था/ बर्लिन
भारताचा किशोरवयीन ग्रँडमास्टर डी. गुकेशने उझ्बेकचा माजी वर्ल्ड रॅपिड चॅम्पियन नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्हचा धक्कादायक पराभव करीत वर्ल्ड चेस आर्मागेडॉन आशिया, ओशेनिया बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
रविवारी उशिरा झालेल्या अंतिम लढतीत अनेक चढउतार पहावयास मिळाले. पहिल्या गेममध्ये संधी गमविल्यानंतर गुकेशने दुसरा गेम गमविला आणि एक्स्ट्रा लाईफचा उपयोग करीत लढतीला पुन्हा सुरुवात केली. या नव्या लढतीतील पहिला गेम बरोबरीत राहिल्यानंतर दुसरा गेम जिंकून गुकेशने जेतेपद पटकावले. गुकेश व अब्दुसत्तोरोव्ह दोघांनीही येत्या सप्टेंबरमध्ये होणाऱया आर्मागेडॉन ग्रँड फिनालेसाठी स्थान मिळविले आहे. 16 वर्षीय गुकेशने नामवंत खेळाडूंचा सहभाग असलेली ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. या नामवंतांत माजी वर्ल्ड क्लासिकल चॅम्पियन ब्लादिमिर पॅमनिक, डॅनील डुबोव्ह, यांगयी यू (चीन), विदित गुजराथी, मुरली कार्तिकेयन (दोघेही भारत), परम मघसूदलू (इराण) व अब्दुसत्तोरोव्ह यांचा समावेश होता.
‘वर्ल्ड चेसने आयोजित केलेल्या आर्मागेडॉन सिरीज 2023 आशिया-ओशेनिया स्पर्धेत रोमांचक विजेतेपद मिळविता आले, याचा खूप आनंद होतो. जलद टाईम कंट्रोलची स्पर्धा जिंकण्यात अखेर यश आल्याने मी सुटकेचा निःस्वास सोडला. या स्पर्धेत अनेक नवे अनुभव घेता आले. या स्पर्धेचा मी पुरेपूर आनंद घेतला, ज्यात लाईट्स, मेकअप यासारख्या गोष्टींचा उपयोग करण्यात आला होता,’ असे गुकेश जेतेपदानंतर म्हणाला. भारताचा माजी वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंदनेही गुकेशच्या यशानंतर त्याचे अभिनंदन केले आहे. वेगळय़ा टाईम कंट्रोलमधील स्पर्धेत त्याने मिळविलेले यश ही खास अचीव्हमेंट आहे. आमच्या या छोटय़ा बुद्धिबळपटूने आमचा अभिमान पुन्हा एकदा वाढविला आहे, असे आनंदने गुकेशबद्दल ट्विट संदेशात म्हटले आहे.
या स्पर्धेच्या प्रत्येक दिवशी दोन ब्लिट्झ डावांचा समावेश असतो आणि गरज पडल्यास आर्मागेडॉन डावाचा (पांढऱया मोहरा घेणाऱयास 5 मिनिटे व काळय़ा मोहरा घेणाऱयास 4 मिनिटे) अवलंब केला जातो. आर्मागेडॉन हा ब्लिट्झचाच एक प्रकार असून अनेक सामने ड्रॉ झाल्यानंतर विजेता ठरविण्यासाठी त्याचा आधार घेतला जातो. आर्मागेडॉनमध्ये गेम अनिर्णीत राहिल्यास काळय़ा मोहरांनी खेळणाऱयास विजेता ठरविण्यात येते.









