म. ए. समिती उमेदवार मुरलीधर पाटील यांची प्रचारफेरी-पदयात्रा
वार्ताहर /जांबोटी
मराठी भाषा व संस्कृतीच्या संरक्षणासाठी व सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी खानापूर विधानसभा मतदारसंघातील म. ए. समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांना विजयी करण्याचा निर्धार ओलमणी गावातील युवकांनी केला आहे. त्यांच्या प्रचारार्थ शेकडो युवकांनी गावातून पदयात्रा काढून घरोघरी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन मराठी अस्मितेसाठी मुरलीधर पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले. ओलमणी हे गाव समितीचा अभेद्य बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. 1956 सालापासून झालेल्या प्रत्येक निवडणुकीत ओलमणी गाव समिती उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून समिती उमेदवाराला खानापूर तालुक्मयात सर्वाधिक मतांची आघाडी मिळवून देणारे गाव म्हणून ओळखले जाते. सीमाप्रश्न सुटावा व महाराष्ट्रात सामील होण्याच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर येथील आबालवृद्ध, युवक व महिला म. ए. समिती उमेदवारांना भरभरून मतदान करतात. राष्ट्रीय पक्षांच्या आवाहनाला तोंड देत कोणत्याही आमिषाला बळी न पडता समिती उमेदवाराच्या पाठीशी ढालीप्रमाणे उभा राहण्याची परंपरा या गावाने आजही कायम राखली आहे. समिती उमेदवार मुरलीधर पाटील यांना विजयी करण्याच्या गावातील युवावर्गाने निर्धार केला आहे. रविवारी रात्री युवकांनी गावात पदयात्रा काढून प्रचारफेरीद्वारे घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेऊन म. ए. समिती उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी जय शिवाजी जय भवानी…, महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय असो, रहेंगे तो महाराष्ट्र मे नही तो जेल मे आदी घोषणांनी गाव दणाणून सोडला होता.









