इचलकरंजी : प्रतिनिधी
रुई (ता.हातकणंगले ) येथील आण्णासाहेब राजमाने हायस्कूल जवळ ट्रॅक्टर ,टेम्पो आणि दुचाकी या तिहेरी अपघातात दुचाकीवरील युवक गणेश कांबळे ( वय १८) (रा. सिद्धार्थ नगर, कोरोची) हा ऊसाने भरलेल्या ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाला. तर त्याचा मित्र अभय कांबळे हा जखमी झाला आहे.
घटनास्थळी मिळालेली माहिती अशी, दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास रुई येथील राजमाने हायस्कूल जवळून गणेश आणि त्याचा मित्र अभय आपल्या दुचाकी स्प्लेडर (एम. एच.०९ जी.बी.४४६०) वरून रुईला नदीत मासे पकडण्यासाठी निघाले होते. याच वेळी ऊसाने भरलेला ट्रॅक्टर (एम. एच. २४ – ९२७३) हा जवाहर साखर कारखान्याकडे निघाला होता. दरम्यान रुई फाट्याकडे जाणार टेम्पो आयचर (डी .डी. ०५ बी.बी. ६२२२) हा डिझेल संपले म्हणून रस्त्या कडेला थांबला होता. दुचाकीवरून जाणारे युवक ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत असताना उभा असलेला टेम्पो आणि ट्रॉली यांच्या मध्ये दुचाकीची धडक झाली. यावेळी दुचाकी चालवणारा अभय टेम्पोकडे पडला तर मागे बसलेला गणेश हा ट्रॉलीच्या बाजूला पडून तो चाकाखाली सापडला. ट्रॉलीचे चाक त्याच्यावरून पलीकडे न जाता ट्रॉलीच्या चाकाखाली सापडलेल्या युवकाला अडकलेल्या अवस्थेतच सुमारे १०० फुटापेक्षा जास्त अंतर रस्त्यावरून फरपटत नेले. यावेळी त्याचा जागेवरच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र अभय हा जखमी झाला असून त्याच्यावर इचलकरंजी येथील आय. जी. एम.हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.
मयत गणेश हा बारावीच्या वर्गात शिकत होता. त्याला दोन बहिणी आहेत.घटनास्थळी आपल्या एकुलत्या मुलाचा मृतदेह पाहून वडिलांनी केलेला आक्रोश हा हृदय पिळवटून टाकणारा होता. घटनेची माहिती समजताच हातकणंगले पोलीस स्टेशन चे पोलीस घटनास्थळी हजर झाले. शवविच्छेदनासाठी हातकणंगले येथील सरकारी दवाखान्यात पाठविण्यात आले.
अपघाताची मालिका
रुई ते रुई फाटा या मार्गावर प्रचंड वाहतूक असते. गेली अनेक वर्ष या रस्त्याची दुरावस्थाच होती. काही महिन्यापूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. परंतु रस्त्याच्या दोन्ही बाजूस असणारे अतिक्रमण ग्रामपंचायतीला हलवता आलीच नाही. त्यामुळे ऊस वाहतूक सुरू झाल्यानंतर प्रत्येक वर्षी अपघाताची मालिका सुरूच आहे. ग्रामपंचायतीच्या अतिक्रमणाकडे दुर्लक्षामुळे अनेकांना मात्र जीव गमवावा लागत आहे