कळंबा / सागर पाटील :
कोल्हापुरात शिकायंच, पण भविष्यासाठी बाहेर जावं लागतंय हे आजच्या तरुणांचं वास्तव आहे. शिक्षणानंतर नोकरीच्या किंवा उद्योगाच्या शोधात कोल्हापूरची तरुणाई मोठ्या शहरांकडे वळतेय. यामागे कोल्हापुरातील मर्यादित संधी, स्थानिक उद्योगांचा घटता गतिमान विकास आणि नव्या स्टार्टअप्ससाठी अपुरे सहकार्य हे प्रमुख कारण मानले जात आहे.
- शिक्षणात उजळ, रोजगारात अपुरा….
कोल्हापूर जिल्हा शिक्षण क्षेत्रात बऱ्यापैकी प्रगतीशील मानला जातो. इथे अभियांत्रिकी, वैद्यकीय, कला, वाणिज्य, कृषी अशा विविध क्षेत्रांमध्ये शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. शाळा–महाविद्यालयांपासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत विविध पर्याय उपलब्ध आहेत. मात्र शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगाराच्या संधी मात्र अत्यंत मर्यादित आहेत. गेल्या काही वर्षांत नव्या उद्योगांची संख्या फारशी वाढलेली नाही. पारंपरिक साखर कारखाने, यंत्रउद्योग, पोल्ट्री उद्योग हेच अजूनही रोजगाराचे मुख्य आधार आहेत. माहिती तंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी, ई–कॉमर्स किंवा क्रिएटिव्ह इंडस्ट्री यांसारख्या आधुनिक क्षेत्रांत कोल्हापुरात फारशा संधी उपलब्ध नाहीत. त्यामुळे कोल्हापूरचे पदवीधर मुंबई, पुणे, बंगळूरु, हैदराबाद किंवा परदेशाकडे रोजगारासाठी वळत आहेत.
- स्थानिक परिस्थिती आणि तरुणांची निरीक्षणं
कोल्हापूर शहरात उद्योजकता वाढावी यासाठी सरकारने काही योजना जाहीर केल्या असल्या तरी त्या प्रत्यक्षात अंमलात आणण्यात अपयश येत आहे. तरुण उद्योजकांनी सुरू केलेल्या स्टार्टअप्सना भांडवली गुंतवणुकीचा अभाव भासत आहे. त्यातच तांत्रिक मार्गदर्शन, बाजारपेठेतील संधी आणि नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्सची उणीव जाणवते.
स्टार्टअप सुरू करायचं म्हटलं, तर जागेची अडचण, मंजुरीसाठी लागणारी कागदपत्रं, आणि गुंतवणूकदार मिळण्याचा अभाव यामुळे अनेक चांगल्या कल्पना फक्त मनातच घर करून राहत आहेत
- तरुणांमध्ये बेरोजगारीचं वाढतं संकट
कोल्हापुरात दरवर्षी हजारो विद्यार्थी पदवीधर होतात. परंतु, स्थानिक उद्योगांना मर्यादित गरज असल्याने बहुतांश तरुण बेरोजगार राहतात किंवा त्यांच्या कौशल्यापेक्षा खालच्या दर्जाच्या नोकऱ्या पत्कराव्या लागतात. काही तरुण सरकारी नोकरीच्या आशेवर वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षांची तयारी करत राहतात. अनेकांची ही वाटचाल शेवटी नैराश्याकडे होते.
- गावाकडून शहरात आणि शहरातून शहराबाहेर
ही स्थिती केवळ कोल्हापुरातच नाही, तर जिह्यातील ग्रामीण भागांतून शहरात स्थलांतर आणि नंतर शहरातून बाहेर स्थलांतर अशी दुहेरी प्रक्रिया सुरु आहे. शेतीवर आधारीत असलेल्या कुटुंबातील तरुण शिक्षणानंतर गावाकडे परत न जाता थेट पुणे–मुंबईतच वस्ती करतात. त्यांच्या शिक्षणाचा, कौशल्याचा उपयोग मातृगावासाठी न होता इतर शहरांतील प्रगतीसाठी होतो.
- तरुणांसाठी प्रोत्साहनात्म योजनांची गरज
कोल्हापूरसारख्या जिह्यातून तरुणाई बाहेर जाऊ नये, यासाठी स्थानिक पातळीवर ठोस उपाययोजना कराव्या लागतील. राज्य सरकारने स्टार्टअप्ससाठी जाहीर केलेल्या योजना जिल्हास्तरावर प्रभावीपणे लागू कराव्यात. माहिती तंत्रज्ञान, कृषी प्रक्रिया उद्योग, अन्न प्रक्रिया, टुरिझम यासारख्या क्षेत्रांमध्ये तरुणांना प्रोत्साहन द्यावं लागेल. जिह्यात खास स्टार्टअप हब, इन्क्युबेशन सेंटर्स, आणि युवा मार्गदर्शन केंद्र उभारल्यास परिस्थिती सुधारू शकते.
- शासनाच्या धोरणांमध्ये कोल्हापूर कुठे?
‘मेक इन इंडिया’, ‘स्किल इंडिया’, ‘स्टार्टअप इंडिया’ या राष्ट्रीय उपक्रमांत कोल्हापुरात फारसा परिणाम दिसत नाही. जिह्यातील औद्योगिक वसाहतींची अंमलबजावणी संथ आहे. कोल्हापुरात घ्ऊ पार्क उभारण्याची घोषणा अनेक वेळा झाली. पण प्रत्यक्ष कामावर फारसा परिणाम दिसून आलेला नाही. त्यामुळे शासकीय घोषणा केवळ फलकांपुरत्या मर्यादित राहिल्या आहेत.
शिक्षणाच्या बाबतीत प्रगतीशील असलेला कोल्हापूर रोजगाराच्या आणि उद्योजकतेच्या संधींच्या बाबतीत मात्र मागे पडतोय. कोल्हापूरच्या तरुणांची प्रतिभा, मेहनत आणि कल्पकता दुसूया शहरांना मिळतेय. हे चित्र बदलण्यासाठी केवळ सरकार नव्हे, तर स्थानिक उद्योग, शिक्षण संस्था, आणि समाजानेही पुढाकार घेण्याची गरज आहे. अन्यथा, कोल्हापुरात संधी कुठे? हा प्रश्न आणखी ठसठशीतपणे समोर राहणारा आहे.








