होनगानजीक गुरुवारी सायंकाळी घडला अपघात
बेळगाव : भरधाव कारने दुचाकीला ठोकरल्याने तानाजी गल्ली, कंग्राळी बी. के. येथील एका युवकाचा मृत्यू झाला. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील होनगानजीक गुरुवारी सायंकाळी 4.15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. काकती पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे. सचिन शंकर पाटील (वय 31) असे मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या सचिनला खासगी इस्पितळात हलविण्यात आले होते. उपचाराचा उपयोग न होता सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच काकतीचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. केए 22 एचएल 5091 क्रमांकाच्या टीव्हीएस ज्युपिटर दुचाकीवरून सचिन दासवाडीला जात होता. होनगाजवळील रॉयल रसोई ढाब्यानजीक केए 03 एमएक्स 1688 क्रमांकाच्या भरधाव कारने सचिनच्या दुचाकीला धडक दिली. कारचालक संकेश्वरहून बेळगावकडे येत होता. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सचिनचा मृत्यू झाला. काकती पोलीस पुढील तपास करीत आहेत.









