कागल, प्रतिनिधी
चॉकलेटचे आमिष दाखवून साडेसात वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी कागल-गणेशनगर येथील अमोल मधुकर आवळे या तरुणाच्या विरोधात मंगळवारी कागल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. मुलीचे अपहरण करून अत्याचार केल्याप्रकरणी त्याच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतची माहिती अशी, अमोल आवळे याने या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून आपल्या घरी नेले. दरवाजाला कडी लाऊन तो मुलीसोबत घरात काहीकाळ होता. मुलीच्या नातेवाईकांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडून मुलीसह त्याला बाहेर काढले. जमावाने त्याला चांगलाच धडा शिकवत पोलिसांच्या ताब्यात दिले.
सकाळी अकरा वाजता ही घटना घडली. या प्रकरणी अमोल आवळे याच्या विरोधात संबंधितांनी कागल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तो शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थेत कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत होता. आईसह तो घरी राहत होता. त्याची आई कामासाठी बाहेर गेली असताना त्याने हे घृणास्पद कृत्य केल्याचे पोलिसातून सांगण्यात आले. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. याचा तपास पोलीस उपनिरीक्षक मोनिका खडके करत आहेत.









