खेड :
तालुक्यातील घाणेखुंट–गवळवाडी येथे सुरू असलेल्या नवीन इमारतीच्या बांधकामावर पाणी मारत असताना मोटर पंपच्या विद्युतभारित तारेच्या स्पर्शाने गणेश हरिचंद्र उतेकर (40 रा. धामणंद–पायरवाडी) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेने ऐन शिमगोत्सवात उतेकर कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
गणेश हा तरुण घाणेखुंट येथे सुरू असलेल्या नवीन इमारत बांधकामावर मजुरीच्या कामास होता. नेहमीप्रमाणे तो सकाळी बांधकामावर पाणी मारण्याचे काम करत होता. या कामासाठी पाण्याची मोटर मशिन चालू केली होती. या मशिनच्या तारेचा स्पर्श झाल्याने तो जागीच गतप्राण झाला. ही बाब अन्य सहकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर लोटे पोलीस दूरक्षेत्रास कळवण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला. याप्रकरणी सायंकाळी उशिरा येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.








