घरफोड्यांप्रकरणी पोलिसांची कारवाई : अडीच लाखाचे दागिने जप्त
बेळगाव : घरफोड्या केल्याच्या आरोपावरून एपीएमसी पोलिसांनी मुस्लीम गल्ली अनगोळ येथील एका तरुणाला अटक केली आहे. त्याच्याजवळून अडीच लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अब्दुलगणी शब्बीर शेख (वय 24 रा. मुस्लीम गल्ली अनगोळ) असे त्याचे नाव आहे. कंग्राळी खुर्द व चिक्कूबाग परिसरात घरफोड्या केल्याची कबुली त्याने दिली असून शनिवारी त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. त्याच्याजवळून 2 लाख 55 हजार रुपये किमतीचे सोन्या चादींचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमणी यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसीचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ कब्बुरी, पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री, त्रिवेणी नाटीकर, किरण होनकट्टी, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी. के. मिटगार, व्ही. डी. बाबानगर, डी. सी. सागर, बसवराज बानसे, केंपण्णा दोडमनी, गोविंदप्पा पुजार, नामदेव लमाणी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी अटक केलेला अब्दुलगणी हा व्यवसायाने पेंटर आहे. एपीएमसी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील चोरी प्रकरणांच्या तपासासाठी संशयावरून त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने दोन घरे फोडल्याची कबुली दिली आहे.









