सातारा :
वासुळे (पाटखळ, ता. सातारा) येथील मराठा अॅकॅडमीतील २५ वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सुनील सीताराम चिकणे (रा. चेंबुर, मुंबई) असे त्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुनील चिकणे हा वासुळे येथील मराठा अॅकॅडमीत भरतीचे प्रशिक्षण घेत होता. गेल्या दोन दिवसांपासून त्याला सतत अस्वस्थ वाटत होते. यामुळे तो जिल्हा रुग्णालयात जाऊन उपचार घेत होता. शुक्रवारी सकाळी तो रनिंग करण्यासाठी परिसरातील मैदानावर गेला. याच वेळी त्याच्या छातीत दुखू लागल्याने तो खाली बसला. ही बाब शिक्षक व विद्यार्थ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच तो मयत झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. घटनेची नोंद तालुका पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.








