प्रतिनिधी / बेळगाव
युथ फॉर सेवाच्या बेळगाव शाखेतर्फे ‘सेवा संभ्रमा’ हा स्वयंसेवकांना त्यांच्या सेवेची नोंद घेऊन प्रमाणपत्र वितरित करण्याचा कार्यक्रम नुकताच आरएलएस कॉलेजमध्ये झाला. प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त कर्नल दीपक गुरुंग उपस्थित होते. निमंत्रित म्हणून उद्योजक लिंगराज जगजंपी तसेच जय भारत फाऊंडेशनचे बसनगौडा पाटील आदी उपस्थित होते.
दीपक गुरुंग यांनी स्वयंभू व्हा, आत्मविश्वास वाढवा, विनयशील रहा व देशाची सेवा करा आणि समाजासाठी कार्यरत रहा, असे सांगितले. लिंगराज जगजंपी यांनी निसर्ग आणि पर्यावरण जपण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. बसनगौडा पाटील यांनी संस्थेच्या कार्याची प्रशंसा करून शालेय विद्यार्थ्यांसाठी काम करण्याचा सल्ला दिला. शिक्षिका सुमंगला संगळद यांनी युथ फॉर सेवाची माहिती दिली. नीता गंगरेड्डी यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. समन्वयक संतोष खोत यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. एकूण बारा कॉलेजमधील 94 स्वयंसेवकांना व 10 सामान्य स्वयंसेवकांना प्रमाणपत्रे देण्यात आली.









