वैजी-भोम मार्गावरील घटना; दुसरा तरुणही जखमी; अपघातानंतर रिक्षाचालक झाला पसार
चिपळूण प्रतिनिधी
तालुक्यातील वैजी-भोम मार्गावरील वैजी-भडवळकरवाडी परिसरात ॲपे रिक्षा व दुचाकी यांच्यात अपघात झाल्याची घटना सोमवारी सकाळी 9.35 च्या सुमारास घडली. यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीचालक तरुणाचा मृत्यू झाला असून अन्य एक तरुण जखमी झाला आहे. या अपघातानंतर ॲपे रिक्षा चालकाने येथून पलायन केले असून या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रितम मोहिते (21) असे मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे, तर प्रथमेश मंगेश मोहिते असे जखमी झालेल्या तरुणाचे (22, दोघेही वैजी) नाव आहे. या बाबतची फिर्याद प्रथमेश याने दिली असून त्यानुसार ॲपे रिक्षाचालक (नाव-गाव माहिती नाही) गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश व प्रितम हे दोघे दुचाकीने वैजी-भोम मार्गाने जात होते. ते वैजी-भडवळकरवाडी येथे आले असता ॲपे रिक्षा चालकाने त्याच्या दुचाकीला समोरुन जोरदार धडक दिली. यात प्रथमेश व प्रितम हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर ॲपे रिक्षा चालकाने पलायन केले आहे. यात प्रथमेश याच्या पायाला दुखापत झाली आहे. तसेच दुचाकी चालवत असलेल्या प्रितम याच्या हातासह डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्या दोघांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असतानाच प्रितम याचा मृत्यू झाला. दरम्यान, पलायन केलेल्या ॲपे रिक्षा चालकाचा पोलीस शोध घेत आहेत.









