गुहागर :
तालुक्यातील शृंगारतळी–आबलोली मार्गावर कोतळूक–मांडवकरवाडी येथे क्रेटा कार रस्त्याच्या बाजूला नदीपात्रात जाऊन झालेल्या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या वेळंब येथील वैद्यकीय व्यावसायिक अभय अरविंद ओक (51) यांचे निधन झाले. बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास हा अपघात घडला.
अभय ओक हे आबलोली ते शृंगारतळी असा आपल्या क्रेटा कारने प्रवास करत असताना तालुक्यातील कोतळूक–मांडवकरवाडी येथे सकाळी 11 च्या दरम्यान आले असता त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या बाजूला नदीपात्रात गेली. यामध्ये ओक यांच्या डोक्याला जबर मार बसला होता. अपघाताची खबर मिळताच तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्रथम ओक यांना शृंगारतळी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. तेथून अधिक उपचारासाठी डेरवण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे उपचार सुरू होण्याअगोदरच तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ते मृत असल्याचे जाहीर केले.
- तीन महिन्यांपूर्वीच वडिलांचे निधन
अभय ओक यांचे आबलोली येथे औषधांचे दुकान आहे. ते मूळचे वेळंब येथील असून त्यांची मोठी बागायत आहे. तीन महिन्यांपूर्वीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी आणि आई असा परिवार आहे.








