रत्नागिरी प्रतिनिधी
शहरातील पेठमाप येथील एन्राॅन पुलानजीकच्या झाडावर आंबे काढण्यासाठी चढलेल्या तरुणाला वीज वाहिनीचा झटका लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. याबाबत पोलीस स्थानकात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
अल्ताफ सलीम सुर्वे (२३, सध्या रा. गोवळकोट रोड, पलोजी बाग, मूळचा आंध्रप्रदेश) असे मृत तरुणाचे नाव आहे. पेठमाप परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. नेमका वीज पुरवठा कशामुळे खंडित झाला त्याचा शोध महावितरणच्या कर्मचाऱ्यांमार्फत घेतला जात असताना एका तरुणाचा मृतदेह झाडावर लटकलेल्या स्थितीत आढळून आला. त्यानंतर काही वेळाने मृत अल्ताफ सुर्वे याची ओळख पटली.अल्ताफ हा बाजारपेठेतील एका चप्पल दुकानात कामाला होता. त्याचे नुकतेच लग्नही ठरले होते. २२ मे रोजी त्याचा विवाह होणार होता. त्याच्या पश्चात आई वडील, दोन बहिणी असा परिवार आहे.









