संगमेश्वर :
रेल्वे गाडी नंबर ११०० मडगाव लोकमान्य टिळक टर्मिनलमधून प्रवास करीत असलेल्या प्रवाशाने अचानक गाडीमधून उडी टाकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. गिरेन अजित राजभोक्षी (वय ३१ वर्षे, रा. रामपूर पोस्ट गोरेश्वर आसाम) असे त्या युवकाचे नाव आहे.
मंगळवारी २१ रोजी ट्रॅकमन संतोष कळंबटे यांना रेल्वेचे कनिष्ठ अभियंता जाधव यांनी मौजे भिरकोंड या ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पुरुष मयत दिसून आल्याचे फोनद्वारे कळवले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक अमित यादव, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कांबळे, आव्हाड, म्हैसकर, रामपुरे आणि पंदेरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या घटनेची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. गिरेन राजभोक्षी याने आत्महत्या केली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून आत्महत्या का केली याबाबत अद्याप समजू शकलेले नाही.








