मुरूड- जिंजिरा, प्रतिनिधी
Dapoli News : मुरुडजवळील मोरा गावच्या समुद्रात बुधवारी सकाळी मासेमारी नौका आकस्मिकपणे उलटून पाण्यात पडलेल्या वसंत धर्मा कासारे (वय-३७) यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासमवेत त्यांचे भाऊ सुभाष कासारे आणि सुरेश कासारे यांनी पोहत किनारा गाठल्याने ते बचावले.
याबाबत मुरूड- जिंजिरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी वसंत कासारे, सुभाष कासारे आणि सुरेश कासारे हे सख्खे भाऊ फायबरची नौका घेऊन मोरा या भागातील समुद्रात मासेमारीसाठी गेले होते. खोल पाण्यामध्ये गेल्यावर उसळत्या लाटांमुळे नौका उलटून हे तिघेजण पाण्यात पडले.
यापैकी सुरेश आणि सुभाष यांनी पोहून किनारा गाठला.यावेळी छोटा भाऊ वसंत यालाही वाचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला,परंतु प्रयत्न अयशस्वी ठरले.वसंत कासारे यांच्या नाका-तोंडात पाणी शिरल्याने ते गुदमरले आणि त्यांचा मृत्यू झाला.हे तिघेही मोरा गावचे रहिवासी आहेत.मृत वसंत यांच्या देहाचे मुरूड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.वसंत कासारे हे विवाहित आहेत.गणेशोत्सवात अशी दुर्दैवी घटना घडल्याने ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.