सातारा :
पुणे -बेंगलोर महामार्गावरुन साताऱ्याकडे येताना भरधाव ट्रकची दुचाकीला पाठीमागून भीषण धडक बसली आणि या अपघातात मंगळवार पेठेत राहत असलेला आकाश नंदकुमार गोळे (वय 18) याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास घडला असून ट्रकने पाठीमागून एवढी जोराची धडक आकाशच्या दुचाकीला दिली होती की, घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता.
याबाबत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी दिलेल्या माहितीनुसार आकाश गोळे हा त्याच्या दुचाकीवरुन रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास सातारा बाजूकडे येत होता. त्याच दरम्यान, भरधाव वेगाने अज्ञात ट्रकने त्याच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. त्या धडकेत त्याची दुचाकी फरफटत गेली. त्याच्या अंगावरुन ट्रकचे चाक जावून त्याचा जागीच मृत्यू झाला. याची माहिती तेथील स्थानिकांनी पोलिसांना दिली. शहर पोलीस ठाण्याचे अपघात विभागाचे पोलीस जवान जयवंत कारळे हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तात्काळ रुग्ण्वाहिका बोलवली. परंतु अपघातात मृतदेहाच्या अंगावरुनच ट्रकचे चाक गेले होते. त्यामुळे जागीच मृत्यू झाला होता. मृताची ओळख लगेच पटवण्यात आली. दरम्यान, आकाश गोळे हा मंगळवार पेठेत राहत होता. त्याचे वडील गजरे विक्रीचा व्यवसाय करतात. त्याला आणखी एक भाऊ असून आकाशच्या अपघाती निधनामुळे गेळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याचा तपास सातारा शहर पोलीस करत आहेत.








