वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
17 वर्षाखालील वयोगटाची यूथ कप फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीला 23 जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेतील बाद फेरीचा ड्रॉ काढण्यात आला. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतील सामने संपल्यानंतर गेल्या शुक्रवारी बाद फेरीसाठी ड्रॉ काढण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनचे सरचिटणीस शाजी प्रभाकरन यांनी दिली.
हिरो पुरस्कृत 17 वर्षाखालील वयोगटाच्या यूथ कप फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीतील सामने हैदरबादच्या डेक्कन स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. बाद फेरीच्या स्पर्धेत एकूण 16 संघांचा समावेश असून 31 जानेवारीला अंतिम सामना खेळवला जाईल. या स्पर्धेच्या प्राथमिक गटामध्ये एकूण 49 संघांचा समावेश होता. हे संघ दहा गटात विभागण्यात आले होते. या 10 गटातील आघाडीचे संघ पात्र फेरीत प्रवेश मिळवला आहे.









